गॅस कनेक्शन तोडू म्हणत उडवले साडेतीन लाख; मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 09:50 AM2024-09-17T09:50:34+5:302024-09-17T09:51:58+5:30
वीजपुरवठा खंडित होईल अशी भीती घालून फसवणुकीचे अनेक प्रकार आतापर्यंत घडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वीजपुरवठा खंडित होईल अशी भीती घालून फसवणुकीचे अनेक प्रकार आतापर्यंत घडले आहेत. मात्र गॅस पुरवठा खंडित करण्याचा मेसेज पाठवत व्यावसायिकाला लाखोंचा चुना लावल्याचा प्रकार बोरिवली पोलिसांच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या राजीव मोहोरीकर (६१) यांना १५ सप्टेंबर रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून एक मेसेज प्राप्त झाला. त्या मेसेजमध्ये तुमचे महानगर गॅस लिमिटेड गॅसचे कनेक्शन रात्री नऊ वाजता डिसकनेक्ट होणार असल्याचे म्हटले होते. सोबत एक क्रमांक पाठवण्यात आला होता. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी भामट्याने मोबाईलवरून राजीव यांना गॅस कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन एमजीएल बिल अपडेट हे ॲप डाऊनलोड करायला सांगितले.
पेमेंटमध्ये अडचणी आल्यानंतर त्यांच्या पत्नी मीनल यांच्या मोबाईलवरही ॲप डाऊनलोड करायला सांगितले. त्यात त्यांच्या क्रेडिट कार्डची माहितीही भरायला लावली. त्यानंतर कोणताही ओटीपी न येता राजीव आणि त्यांच्या पत्नीच्या क्रेडिट कार्ड खात्यावरून या भामट्याने एकूण ३ लाख ४० हजार ७१७ रुपये ट्रान्सफर करून घेतले. बोरिवली पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
परमिशन अलाऊ करणे, पडले महागात-
राजीव यांच्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड होत नव्हते. तेव्हा भामट्याने सेटिंगमध्ये जाऊन परमिशन अलाऊ करण्यास सांगितले. तसे केल्यावर ॲप सुरू झाले. त्यानंतर भामट्याने त्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यांच्या क्रेडिट कार्डचा नंबर टाकायला सांगितले, पण पेमेंट न झाल्याने भामट्याने पत्नीच्या मोबाईलवरही तसे करायला सांगितले. पण सर्व परमिशन अलाऊ करणेच, महागात पडले.