मुंबई : मनोरी येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सुरू असून हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या ठिकाणी असलेल्या तिवरांच्या झाडांवर भराव टाकला जात असून त्यामुळे तिवरांचे जंगल नष्ट होण्याची भीती स्थानिकांनी केली आहे.
या संदर्भात वॉचडॉग संस्थेने राज्याच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार केली आहे. या कामासाठी देण्यात आलेल्या कार्यादेशात तिवरांवर भराव टाका, असे कुठेही म्हटलेले नाही, याकडे संस्थेने लक्ष वेधले आहे. जेट्टी बांधण्याचे काम बोर्डाने डी. व्ही. पी. इन्फ्रा या कंपनीला दिले आहे. त्यासाठी २०१७ साली कार्यादेश देण्यात आला. या कामासाठी अंदाजे साडेसहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. १२ महिन्यांच्या मुदतीत काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली होती. २०१७ साली कार्यादेश मिळूनही काम सुरू करण्यात आले नव्हते.
पोलिसांकडून बघ्याची भूमिका-
मनोरी येथे सुरू असलेले भरावाचे काम पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. मनोरी चौक हा धारावी बेटाच्या समुद्र व खाडी पाण्याने व तिवरांच्या जंगलाने वेढलेले निसर्ग संपन्न बेट आहे.
बेटावरील पर्यावरण जपण्यासाठी व भूमिपुत्रांची संस्कृती व परंपरा टिकवण्यासाठी भरावयाची कामे थांबवावी, अशी मागणी करणारे पत्र समितीने गोराई पोलीस ठाण्यात दिले आहे. तरीही काम थांबलेले नाही. पोलीस ठाण्याच्या नाकाखालून भरावाच्या गाड्या जात असताना पोलीस काहीच कृती करत नाहीत, अशी तक्रार समितीच्या लुड्स डिसोझा यांनी केली.
१) २०२३ साली कामास सुरुवात झाली. त्याहीवेळी स्थानिकांनी भराव टाकण्यास आक्षेप घेतला होता. या ठिकाणी स्थानिक मच्छीमारांच्या होड्या लागतात.
२) भरावाच्या कामामुळे होड्या लावायच्या कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे काम थांबवण्यासाठी स्थानिकांनी ‘धारावी बेट बचाओ समिती’ची स्थापना केली आहे