दुचाकीवर फिरण्याची हौस भागविण्यासाठी बनले चोर; आठ दुचाकींसह दोघे अल्पवयीन ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 03:53 PM2024-04-06T15:53:02+5:302024-04-06T15:55:12+5:30
दुचाकीवर फिरून मौजमजा करण्यासाठी वाहनांची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई : दुचाकीवर फिरून मौजमजा करण्यासाठी वाहनांची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलांकडून ८ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड परिसरात गेल्या काही दिवसांत अनेक दुचाकी चोरीला गेल्या होत्या. मुलुंडच्या स्वप्ननगरी सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणाचीदेखील अशाचप्रकारे इमारतीच्या आवारात लावलेली दुचाकी चोरी झाली होती. दुचाकी मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. परिसरात काही सीसीटीव्हीद्वारे दुचाकी चोरणाऱ्यांचा शोध पोलिसांनी लावला. १३ आणि १६ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांनी या दुचाकी चोरल्याचे समोर येताच, पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतले.
पेट्रोल संपताच दुसरी दुचाकी-
पोलिसांनी मुलांकडे अधिक तपास केला असता, दुचाकीवर फेरफटका मारण्यासाठी ते दुचाकी चोरत होते. त्यानंतर दुचाकीतील पेट्रोल संपताच ही दुचाकी निर्जन ठिकाणी सोडून जात होते. त्यांनतर पुन्हा फिरण्याची इच्छा होताच दुसरी दुचाकी चोरत होते. अशाप्रकारे या दोघांनी एकूण आठ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून पोलिस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.