Join us  

जलवाहिन्या होणार इतिहासजमा; भातसा धरणातून पाणीपुरवठ्यासाठी लवकरच जलबोगदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 9:38 AM

भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलवाहिन्या आगामी काळात इतिहासजमा होणार असून, त्या जागी जलबोगदा बांधण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भातसा धरणातून मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलवाहिन्या आगामी काळात इतिहासजमा होणार असून, त्या जागी जलबोगदा बांधण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात  ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने शहरीकरण झाले असून, तेथे विविध विकासकामे सुरू असतात. या विकासकामांना जलवाहिन्यांचा  अडथळा होत असल्याने दोन्ही जलवाहिन्यांची पातळी खाली सरकविण्यात यावी, अशी विनंती ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेला केली होती. ठाण्याची अडचण दूर करण्यासाठी जलवाहिन्यांच्या जागी जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भातसाच्या दोन्ही जलवाहिन्यांचे पाणी जलबोगदा बांधून त्यातून वळवावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे शहर परिसरात बाळकूम ते मुलुंड नाक्यापर्यंत जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुसाध्यता अहवालात हा बोगदा कशेळी ते मुलुंड नाक्यापर्यंत बांधण्याचे ठरवण्यात आले आहे. या जलबोगद्यातून २,४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्याच्या जलअभियंता खात्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर अहवाल सादर करण्यात आला. 

उंच भागाला पुरवठा करणे शक्य-

साडेचार मीटर व्यासाच्या जलबोगद्यामुळे योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल आणि सर्वात उंच भागापर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल. सुरुवातीला हा जलबोगदा बाळकूम ते मुलुंड असा बांधला जाणार होता. परंतु, आता तो कशेळी ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत बांधण्यात येणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या बाँबे १ आणि २ या दोन मुख्य जलवाहिन्या भातसा धरणातून मुंबईपर्यंत पाणी वाहून आणतात. या जलवाहिन्या कशेळी खाडीजवळ ठाणे शहरात प्रवेश करता आणि पुढे पूर्व द्रूतगती मार्गाच्या दोन्ही बाजूस माजिवडे येथे भूमिगत होऊन पुढे मुलुंड जकात नाक्याजवळ हरी ओम नगर येथून मुंबईत प्रवेश करतात.

२,८९६ कोटी रुपयांचा खर्च-

जलबोगद्याच्या कामासाठी मागविलेल्या निविदेत एफकोन्स इन्फ्रा  या कंपनीची निवड करण्यात आली आहे. विविध करांसह २,८९६ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कंपनीने मेट्रो ४ आणि ५ चे काम केले आहे. तसेच कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रत्येकी ३.८ मीटर व्यासाच्या जुळ्या बोगद्यांचे बांधकाम केले आहे. या प्रकल्पात हुगळी नदीच्या खालून ५.५५ मीटर व्यासाच्या बोगद्याचे काम केले आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकापाणी