मुंबई : वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील टोल यंत्रणा जुनी झाल्याने आता ती बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. आता त्याजागी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त नवी प्रणाली बसवली जाणार आहे. त्यादृष्टीने एमएसआरडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत.
वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील यंत्रणा २०१० मध्ये बसविण्यात आली आहे. आता ही यंत्रणा जुनी झाली असून त्यामध्ये काही वेळा तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रकार घडले होते. तसेच या मार्गावरील दोन मार्गिका मागील काही दिवसांत बंद होत्या. तसेच ऐन गर्दीच्या वेळी फास्टॅगद्वारे टोल वसुलीसाठी वेळ लागत असल्याने वाहनांची रांग लागत होती. त्यातून याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता ही यंत्रणा बदलण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यामुळे जलदगतीने टोल गोळा करणे शक्य होणार आहे.