मुंबई : निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त मालमत्ता कर संकलन केल्यानंतर आता करनिर्धारण आणि संकलन खाते ‘टॉप टेन’ यादीतील बड्या माशांकडे आपला मोर्चा वळवणार आहे. सगळ्यात जुने थकबाकीदार आहेत, त्यांच्याकडून वसुलीसाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे कर थकवणाऱ्या सामान्य लोकांवर, आस्थापनांवर ज्या प्रकारे कारवाई केली, त्याच धर्तीवर ‘टॉप टेन’ यादीतील बड्या धेंडांवरही होणार का, हे येत्या काही दिवसात समजेल.
२५ मे रोजी मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर करभरणा करणाऱ्यांना दरमहा दोन टक्के आर्थिक दंड भरावा लागणार आहे. आतापर्यंत ४८५६. ३८ कोटी रुपयांची भर मालमत्ता कराच्या रूपाने पालिकेच्या तिजोरीत पडली आहे. निर्धारित उद्दिष्टापेक्षा ३५६.३८ कोटी रुपये जास्त कर वसुली झाली आहे. म्हणजे १०८ टक्के कर संकलन झाले आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. ही कर वसुली करण्यासाठी पालिकेने मे महिन्यात कठोर पावले उचलली होती. मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी तर पालिकेचे पथक कारवाईसाठी आल्यावर तत्काळ जागच्या जागी कर भरणा केला होता. सर्वसामान्य लोकांनीही कर भरणा केला. त्यामुळेच पालिकेला उद्दिष्ट गाठता आले, हे स्पष्ट होत आहे.
सुमारे १ हजार कोटींची थकबाकी-
१) कारवाईला घाबरून एकीकडे सर्वसामान्य लोक कर भरणा करत असताना ‘टॉप १०’ यादीतील बड्या थकबाकीदारांनी अजून पालिकेला जुमानल्याचे दिसत नाही.
२) गेल्या दीड महिन्यापासून कर निर्धारण आणि संकलन खाते टॉप १० थकबाकीदरांची यादी प्रसिद्ध करत आहे.
३) या यादीत जवळपास दीडशे बड्या मंडळींचा समावेश आहे. त्यात मोठ्या गृहनिर्माण संस्था, मोठे व्यावसायिक, कंपन्या, विकासक, आदींचा समावेश आहे. मात्र, यापैकी फारच कमी जणांनी कर भरणा केलेला आहे.
४) या सगळ्यांकडे मिळून अंदाजे एक हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे यांच्यावरही पालिका कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
५) थकबाकीदारांना नोटीस पाठवल्या आहेत. कर भरणा न केल्यास कारवाई होईल, असे कर निर्धारण खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.