नवीन प्रशस्त मरिन ड्राइव्हची पर्यटकांना भुरळ; ‘क्वीन नेकलेस’चे विलोभनीय दृश्य पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:28 AM2024-06-19T09:28:07+5:302024-06-19T09:31:37+5:30
मुंबईतील सर्वांत आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या मरिन ड्राइव्ह परिसरातील १.०७ किलोमीटर लांबीचा पदपथ पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईतील सर्वांत आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या मरिन ड्राइव्ह परिसरातील १.०७ किलोमीटर लांबीचा पदपथ पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या कामासाठी हा पदपथ बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता जी. डी. सोमाणी चौक ते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या दक्षिण ते उत्तर दिशेच्या टप्प्यातील पदपथ आता वापरासाठी पालिकेने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पर्यटकांना पावसाळ्यात तेथे उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा, तर रात्रीच्या वेळेस राणीचा रत्नहार अर्थात ‘क्वीन नेकलेस’चे विलोभनीय दृश्य पुन्हा पाहता येणार आहे. मरिन ड्राइव्हवर पर्यटकांना बसण्याची पूर्वी सारखीच आसनव्यवस्था केली आहे. शिवाय चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी पथदिवे उभारण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
अतिरिक्त सेवा रस्ता, तसेच पदपथही पर्यटकांसाठी खुला झाला आहे. या पदपथाच्या शेजारच्या समुद्राच्या भिंतीची उभारणी ही बीम आणि कॉलमचा वापर करून केली आहे. त्यामुळे अतिरिक्त भराव न घालताच आतल्या बाजूला हा नवीन पदपथ तयार केला आहे. या पदपथाला धडकणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आघात रोखण्यासाठी तसेच लाटांचा वेग कमी करण्यासाठी टेट्रापॉडचा वापर केला आहे. मरिन ड्राइव्ह येथील ५९० मीटर भागात टेट्रापॉडचे काम दक्षिण ते उत्तर अशा दिशेत सुरू आहे.
वाहतुकीसाठी रस्ता खुला -
१) मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अंतर्गत दुसरा बोगदा १० जूनला वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
२) या परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा देतानाच प्रसाधनगृह आणि पदपथ स्वच्छतेसाठी नियमितपणे देखरेख ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
३) मरिन ड्राइव्हच्या परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण या प्रकल्पाच्या निमित्ताने करण्यात आले आहे.
सेवा रस्त्याचा वापर बोगद्याच्या प्रवेशासाठी-
१) १०.५६ मीटर रुंदीचा आणि सरासरी एक किलोमीटर लांबीचा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपूल ते मफतलाल क्लब सिग्नलदरम्यान वापरासाठी उपलब्ध झाला आहे.
२) प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते उत्तर वाहिनीच्या दिशेला रॅम्पला जोडणारा ४०० मीटरचा अंतराचा रस्ता तयार करण्यात आला आहे. यापूर्वी अस्तित्वातील पदपथाचा वापर करून त्यावर हा रस्ता तयार करण्यात आला आहे.
३) त्यापुढील रस्ता मफतलाल सिग्नलपर्यंत, असा सरासरी एक किमी लांबीचा नवा रस्ता वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाच्या शेजारच्या या अतिरिक्त सेवा रस्त्याचा उत्तर बोगद्याच्या प्रवेशासाठी वापरता येणार आहे.