मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी या महामार्गावर रोज मोठी वाहतूककोंडी होत आहे. परिणामी दहिसर चेकनाका ते कलानगर जंक्शनपर्यंत अंतर कापण्यात वाहनांना सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी किमान दीड तासाहून अधिक कालावधी लागत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडमुळे वाकोलाजवळ मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती महामार्ग ते टी २ टर्मिनलकडे जाणाऱ्या अंडरपासच्या सदोष आराखड्यामुळे अंधेरीहून वांद्रे येथे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
विलेपार्ले पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या रस्त्याची रुंदी योग्य प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. तेथील खराब रस्त्यांमुळे दहिसर टोल नाक्याकडे जाणे कठीण झाले आहे. हा प्रश्न सोडवण्यात टोल कंत्राटदार अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे पश्चिम द्रुतगती मार्ग आणि सेवा रस्त्यांदरम्यान पदपथावर बांधण्यात आलेली वाहतूक चौकी तात्काळ स्थलांतरित करणे आवश्यक आहे. कारण अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिस मुख्य रस्त्यावर वाहने थांबवितात.
ठोस उपाययोजना करून रोज होणारी वाहतूक कोंडी दूर करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
वर्सोवा-अंधेरी लिंक रोडवरच गॅरेजचालक-मालक वाहनांची दुरुस्ती करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. या संदर्भात पालिकेच्या ‘के’ पश्चिम विभागाच्या आणि वाहतूक विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा.- सीमा अहिर, सात बंगला, वर्सोवा
वांद्रे पूर्व-पश्चिम ते थेट दहिसर पूर्व -पश्चिम परिसरात वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध सरकारी यंत्रणांद्वारे मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत रस्ते, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांची कामे मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळेही वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.या अनेक ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामामुळे सध्या नागरिक, प्रवासी-वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासन, वाहतूक पोलिस, वाहतूक तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि अशासकीय संस्था याची एक समिती मुख्यमंत्र्यांनी स्थापन करावी. वाहतूककोंडीची कारणे शोधून ती कशी फोडता येईल, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.- ॲड. गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन