Join us  

यंदा पावसात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक २८ वेळा ठप्प; पूरस्थिती टाळण्यासाठी भूमिगत टाकीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:34 AM

दरवर्षी थोड्याशा पावसातही अंधेरी सबवेमध्ये पाणी साचते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दरवर्षी थोड्याशा पावसातही अंधेरी सबवेमध्ये पाणी साचते. यंदाच्या पावसाळ्यात हा सबवे २८ वेळा वाहतुकीसाठी १५ मिनिटे ते चार तास बंद ठेवावा लागला होता. तर, गेल्यावर्षी हा भूमिगत मार्ग संपूर्ण पावसाळ्यात २१ वेळा बंद ठेवण्यात आला होता. अंधेरी सबवेमधील पूरस्थितीवर अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नसून, या ठिकाणी हिंदमाता आणि मिलन सबवे प्रमाणे भूमिगत टाकी बांधावी, अशी सूचना आमदार अमित साटम यांनी केली आहे.

मुसळधार पाऊस पडला की, पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये अंधेरी सबवेचे नाव पहिल्या क्रमांकावर असते. अंधेरी पश्चिमेतील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे पाऊस पडत असताना व भरतीची वेळ असताना मोगरा नाल्यातील पाण्याची पातळी वाढते व त्यालगत असलेल्या अंधेरी सब वे, दाऊद बाग, आझाद नगर, वीरा देसाई या परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जीवित, तसेच मालमत्तेची हानी होते. 

अंधेरीतील हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचराही होण्यास वेळ लागतो. त्यामुळे पालिकेने या भूमिगत मार्गाजवळील नाल्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. 

गोखले पुलामुळे कामास सुरुवात नाही-

पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमताही वाढवण्यात येणार असून, काही ठिकाणी नाले वळवले जाणार आहेत. मात्र, गोखले पुलाच्या कामामुळे अंधेरी सबवेची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यातच अंधेरी सबवे परिसरात मलनिस्सारणाचे पाणीही येत असल्यामुळे थोड्याशा पावसातही हा सबवे पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहने आत अडकून पडतात. त्यामुळे ताबडतोब सबवेतील वाहतूक बंद करावी लागते.

‘मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता वाढवा, नाले रुंद करा’-

१) अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी पूरपरिस्थितीच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकारी आणि प्रभाग अधिकाऱ्यांसह नुकतीच अंधेरी सबवेची पाहणी केली.

२) या पाहणीनंतर साटम यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र लिहून पुराची कारणे आणि त्या समस्येवर उपाय सुचवले आहेत. 

३) पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याच्या विविध कामांवर ६०० कोटींचा खर्च करणे हे व्यवहार्य नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. अंधेरी पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भुयारी मार्गात पाणी साचते, असे मत साटम यांनी व्यक्त केले आहे. 

४) पालिकेने अंधेरी पूर्वेकडील बाजूस जमिनीच्या खाली किंवा इतर कोणत्याही मोकळ्या जागेवर किंवा रस्त्याच्या खाली भूमिगत टाकी बांधावी. ज्यामुळे पूर्वेकडून पावसाचे येणारे पाणी हे मिलन सबवे प्रमाणे भूमिगत टाकीत जमा होईल, अशी सूचना साटम यांनी केली आहे.

५) एसव्ही रोडवरील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवणे, पूर्वेकडील सांडपाणी कमी करण्यासाठी मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता वाढवणे आणि मिलियनेअर बिल्डिंगपासून सुरू होणाऱ्या नाल्याचे रुंदीकरण करणे, अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :मुंबईपाऊसअंधेरी