Join us  

कोंडीत तासभर अडकायचं; मग ऑफिसला कसं पोहोचायचं? गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे वाहतूककोंडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:51 AM

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा १२.२० किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई : पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा १२.२० किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर गोरेगाव - मुलुंड लिंक रोडच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. 

यामुळे या परिसरात रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून सकाळ-सायंकाळी येथे मोठी वाहतूककोंडी होते. ओबेरॉय जंक्शन सिग्नल ते हायवेच्या उजवीकडे आणि डावीकडे जाण्यासाठी वाहनांच्या रांगा या रोजच्याच असतात. या रांगा कित्येक किलोमीटरपर्यंत लांब असतात. त्यामुळे वाहतुकीचे सर्वच नियोजन फसते. 

गोरेगाव- मुलुंड लिंक रोड हा पूर्णपणे कार्यान्वित होण्यास चार ते साडेचार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या जोडरस्त्याच्या कामामुळे न्यू म्हाडा-नागरी निवाराच्या नागरिकांना गोरेगाव स्टेशनवर सकाळी जाताना, संध्याकाळी घरी परतताना ५० मिनिटे ते एक तास लागतो. या वाहतूककोंडीतून आमची सुटका करा आणि ठोस उपाययोजना करा, अशी मागणी येथील स्थानिकांनी पालिका आणि वाहतूक पोलिसांना केली आहे.

उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने  सकाळी ऑफिसला पोहोचायला, परत सायंकाळी घरी पोहोचण्यासाठी खूप वेळ जातो. वाहतूककोंडीचा त्रास होतो, तसेच अनेक जण जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर दुतर्फा बेकायदा गाड्यांचे पार्किंग करतात. यातून नागरिकांची सुटका होण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठोस उपाययोजना करायला हव्यात. - सुभाष कुलकर्णी, रहिवासी 

अरुणकुमार वैद्य मार्गावर गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे आयटी पार्क, दादासाहेब फाळके चित्रनगरी, पश्चिम द्रूतगती, १२० फूट डीपी रोडकडे जाणारी सर्व वाहने ही रत्नागिरी हॉटेलजवळ अडकून राहतात. यामुळे येथे वाहतूककोंडी होते. अनेकदा दिंडोशी न्यायालयापासूनच रस्ता जाम व्हायला सुरुवात होते. याबाबत वाहतूक विभागाला सांगूनही कारवाई झालेली नाही. वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी उड्डाण पुलाच्या कंत्राटदारानेसुद्धा घेतली पाहिजे. - सुनील प्रभू, आमदार, दिंडोशी मतदारसंघ

टॅग्स :मुंबईनगर पालिकागोरेगावमुलुंडरस्ते वाहतूक