Join us  

चुकलेल्या अंदाजानंतर पाऊस बरसला; मुंबईत १० ठिकाणी झाडे तर ४ ठिकाणी बांधकामे कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 11:16 AM

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली. सकाळपासून दुपारपर्यंत बहुतांशी ठिकाणी सरींवर सरी बरसल्या. दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईत अधूनमधून पडलेल्या या सरींमुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाल्याचे पाहायला मिळाले.

पूर्व उपनगरातील सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, साकीनाका परिसरात गुरुवारी सकाळी आणि दुपारी रिमझिम पाऊस होता. मात्र, पश्चिम उपनगरात गोरेगावसह लगतच्या परिसरात सकाळी जोरदार सरी बरसत होत्या. शहरात परळपासून पुढे फोर्टपर्यंत अधूनमधून विश्रांती घेत पावसाचा तुफान मारा सुरू होता. सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान कुलाबा येथे १०१ मिमी, तर सांताक्रुझ येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली.

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी १० मिनिटे विलंबाने होत होती. दुसरीकडे मुंबईत १० ठिकाणी झाडे पडली, तर चार ठिकाणी बांधकामे कोसळल्याच्या घटना घडल्या. त्याचबरोबर पाच ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

सायनपासून घाटकोपरपर्यंत लाल बहादूर शास्त्री मार्गावर तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय झाली.

पावसाची शंभरी - कुठे पडला किती पाऊस (मिमीमध्ये)

१) मरिन ड्राइव्ह- १८८

२) कुलाबा -१७२

३) शिवडी -१६८

४) दादर -१५३

५) वरळी -१४२

६) माटुंगा -१२७

७) नरिमन पॉइंट -१२०

८) घाटकोपर -११०

९)चेंबूर -१०८

१०) अंधेरी -१००

११) दहिसर -८०

१२) कोपरखैरणे -८६

टॅग्स :मुंबईपाऊस