धूमस्टाईल 'रायडर्स' रडारवर ; ५२ जणांवर दोन गुन्हे दाखल; तब्बल ३४ दुचाक्या हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 09:49 AM2024-06-18T09:49:53+5:302024-06-18T09:50:53+5:30
वांद्रेच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्टंटबाजी, तसेच रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या ५२ जणांवर खेरवाडी पोलिसांनी रविवारी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबई : वांद्रेच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्टंटबाजी, तसेच रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या ५२ जणांवर खेरवाडी पोलिसांनी रविवारी दोन गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व जण १८ ते २३ वयोगटातील आहे. केवळ थ्रिल म्हणून ते अशाप्रकारे गाड्या चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३४ दुचाकीगाड्या हस्तगत करत तपास सुरू केला आहे.
खेरवाडी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्टंटबाजी, रॅश ड्रायव्हिंग करण्यात येत असल्याच्या बऱ्याच तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानुसार परिमंडळ ८ चे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम आणि खेरवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक तिवारी, जाधव, पवार तसेच उपनिरीक्षक लोंढे, ठोंबरे, ब्रह्मनाथ तसेच खेरवाडी डिटेक्शन स्टाफ यांनी येथे सापळा रचला. शनिवारी संध्याकाळी हे आरोपी वांद्रे, माहीम परिसरातून भरधाव वेगात मोटारसायकल चालवत येताना मागावर असलेल्या पोलिस पथकाला दिसले.
जेव्हा सलमानचे आव्हान स्वीकारले!
१) एप्रिल महिन्यात बाईक रेस लावणाऱ्या सलमान खान (२२) नामक तरुणाने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या तावडीतून कसा निसटलो याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत अधिकाऱ्यांना मला पकडून दाखवा असे चॅलेंज दिले होते.
२) जे स्वीकारत त्याच्या मुसक्या खेरवाडी पोलिसांनी आवळून जवळपास ३६ स्टंटबाजाना अटक केली. तसेच त्यांच्या स्पोर्ट्स बाईकही हस्तगत केल्या होत्या.
३) वर्षभरात २५० कारवाया खेरवाडी पोलिसांनी गेल्या वर्षभरात २५० हून अधिक अशाच प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. ज्यात भरधाव वेगात गाड्या पळवणे, स्टंट करणे अशा गुन्ह्याचा समावेश आहे.
बेटिंग लावणाऱ्यावर लवकरच कारवाई-
१) पोलिसांनी खेरवाडी कलानगर परिसरात या सर्वांना अडवत ताब्यात घेतले. विशेषतः शनिवारीच अशा प्रकारच्या रेस होत असून बांद्रा, माहीमसह गोवंडी, शिवाजीनगर परिसरातूनही हे तरुण या ठिकाणी येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
२) यावेळी, आम्ही अद्याप याप्रकरणी ५२ चालकांवर भारतीय दंड संहिता कलम २७९,३३६ अंतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच बेटिंग लावणाऱ्या चालकांवर देखील लवकरच कारवाई करण्यात येईल, असे एका पोलीस अधिकाऱ्यानी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
३) खेरवाडी पोलिसांसोबत गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ८ मधील विलेपार्ले, सहार पोलिसांनी देखील या कारवाईमध्ये सहभाग घेतला.