Join us  

खोटे दागिने गहाण ठेवून दोघींनी सोनाराला लुटले; ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:06 AM

मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, असे म्हणत खोटे दागिने गहाण ठेवत दोन महिलांनी सोनाराला लुबाडले.

मुंबई : मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, असे म्हणत खोटे दागिने गहाण ठेवत दोन महिलांनी सोनाराला लुबाडले. हा प्रकार ओशिवरा पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी सोनाराने तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार संजय जैन (४१) हे जोगेश्वरी पश्चिम परिसरात सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान चालवतात. ७ जून रोजी ३० ते ३५ वयोगटांतील एक महिला त्यांच्या दुकानात आली. तिने कानातील झुमके गहाण ठेवून २० हजार रुपये पाहिजे असल्याचे सांगितले. दोन-तीन दिवसांत ते सोडविणार असल्याचे तिने सांगितले. तिला ओळखत नसल्याने जैन यांनी दागिने गहाण ठेवण्यास नकार दिला. मात्र, तिने मुलांच्या शाळेच्या फीसाठी गरज असल्याचे सांगत विनवणी केली. त्यांनी तिचे नाव विचारले असता रुचिका पालव असे सांगत जोगेश्वरीच्या आंबेडकरनगरमध्ये राहत असल्याचे सांगितले. चौकशीनंतर तिच्या झुमक्यांचे वजन केले असता ते ५ ग्रॅम ५०० मिली भरले. जैन यांनी झुमके स्वतःकडे ठेवत तिला २० हजार रुपये दिले.

 फी भरण्याचा बहाणा -

१) पालव या पैसे घेऊन गेल्यानंतर पंधरा मिनिटांनी स्वतःचे नाव श्रद्धा पाटील सांगणारी तसेच भीमनगरमध्ये राहणारी अजून एक चाळिशीतील महिला जैन यांच्या दुकानात आली. तिनेही जैन यांना अशाच प्रकारे झुमके मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी गहाण ठेवण्यास सांगितले. 

२) जैन यांनी तिलाही नकार दिला. मात्र, तिनेही बरीच विनवणी केल्याने त्यांनी तिचे झुमके गहाण ठेवत तिला २० हजार रुपये दिले. 

३) जैन यांचे मोठे भाऊ मनोहर (५९) यांनी ११ जून रोजी हे दागिने पाहत ते नकली असल्याचे जैन यांना सांगितले. त्यांनी तातडीने अंधेरीच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये जाऊन ते झुमके तपासले असता बनावट असल्याचे उघड झाले. या फसवणूक प्रकरणी जैन यांनी पालव आणि पाटील यांच्याविरोधात तक्रार दिली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस