Join us  

कंत्राटदारांचे नाही, मुंबईकरांचे ऐका! कोस्टल रोडवरील लॅण्डस्केप : आदित्य ठाकरे यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:10 AM

कोस्टल रोड म्हणजे जागतिक दर्जाचे रस्ते, पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रॅक आणि मोकळ्या हिरव्यागार जागा, असा हा प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे.

मुंबई : कोस्टल रोडवरील लॅण्डस्केपचा वापर हा स्थानिकांसह मुंबईकर करणार आहेत. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवासी यांच्याकडूनही या जागांचा वापर सर्वोत्तम कसा करता येईल, यासाठी सूचना मागवा. या जागांचे नियोजन कशा प्रकारे करावे, यासाठी कंत्राटदारांचे नाही तर मुंबईकरांचे म्हणणे ऐका. त्यामुळे प्रकल्पात पारदर्शकता राखली जाईल, अशी सूचना युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोस्टल रोड म्हणजे जागतिक दर्जाचे रस्ते, पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रॅक आणि मोकळ्या हिरव्यागार जागा, असा हा प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. पर्यावरणपूरक, हवामान बदलांना रोखणारा आणि पर्यावरणाची काळजी घेणारा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील वाहतूक वगळता इतर ठिकाणांचे हरित संवर्धन करत उत्तम प्रकारे लॅण्डस्केप तयार करण्यासाठी जागतिक स्पर्धा आयोजित करा, असे आदित्य म्हणाले.

१०० कोटींचा निधी इथे वापरा-

कोस्टल रोड प्रकल्पासाठी नियोजित असलेल्या आणि राखून ठेवलेल्या निधीतूनच हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. हा मुंबईसाठी असलेला प्रकल्प पालिकेने राबविलेला आहे. रेसकोर्सवरील खासगी तबेल्यांवर केला जाणारा १०० कोटींचा खर्च टाळून हा निधी पालिका इथे वापरू शकते, असेही आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाआदित्य ठाकरेराज्य सरकार