अनधिकृत फेरीवाले आले रडारवर; कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कारवाईस अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 09:43 AM2024-08-21T09:43:32+5:302024-08-21T09:46:04+5:30
मुंबई पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असली तरी अतिक्रमण व निर्मूलन विभागाकडे असलेल्या कमी मनुष्यचळामुळे या कारवाईत अडथळे येत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असली तरी अतिक्रमण व निर्मूलन विभागाकडे असलेल्या कमी मनुष्यचळामुळे या कारवाईत अडथळे येत होते. मात्र, आता या कारवाईची धार तीव्र करण्यासाठी पालिकेकडून अतिक्रमण व निर्मूलन विभागाकडून १११ निरीक्षकांची भरती करण्यात येत असून येत्या ४ सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. भरतीमुळे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला वेग येईल, असा विश्वास पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
निरीक्षक भरतीसोबतच प्रत्येक विभागातील कारवाईची वाहने ही वाढविण्यात येणार असल्याने कारवाईनंतर पुन्हा पथारी पसरणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर जरब बसणार आहे. रेल्वेस्थानक परिसरात १७० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे; मात्र नियम धाब्यावर बसवून अनधिकृत फेरीवाले आपली दुकाने थाटून बसतात. मुंबईतील दादर, कुर्ला, वांद्रे, घाटकोपर, सीएसटी आदी रेल्वेस्थानक परिसर अनधिकृत फेरीवाल्यांनी वेढला गेला. आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना कसरत करून चालावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाच्या वतीने नियमितपणे पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले, पथारीवाले, तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येते. उच्च्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, अशा सूचना आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक विभागांत या कारवाईला मर्यादा येत आहेत.
रेल्वे स्थानक परिसरात कारवाईस अडथळा-
पालिकेच्या अतिक्रमण व निर्मूलन विभागात निरीक्षकांची एकूण २९० 3 पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील १७९ पदे भरण्यात आली असून इतर मागच्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. एका अतिक्रमण व निर्मूलन वाहनांवर जवळपास सहा कामगार असतात.
ही कारवाई दोन सत्रांत म्हणजेच सकाळी ८ ते ४ आणि दुपारी ३ ते ११ या दरम्यान होते. दरम्यान, विशेष करून रेल्वेस्थानक परिसरात कारवाईवेळी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते. मोठ्या क्षेत्रात कारवाई करणे अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी कठीण जाते, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारी देतात.
अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई सुरू आहे. भरतीमुळे कारवाईला वेग येईल आणि कारवाईनंतरही पुन्हा फूटपाथवर दुकाने मांडणाऱ्याऱ्यांवर नियंत्रण राहील. याचसोबत वाहनांच्या संख्येतही वाढ केली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोकळ्या पदपथांचा अनुभव घेता येईल. - किरण दिघावकर, उपायुक्त्त (विशेष)