Join us  

पदव्युत्तर प्रवेशासाठी अ‍ॅडव्हान्स अकाउंटन्सीला सर्वाधिक पसंती; पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:37 AM

या पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी, २६ जूनला जाहीर केली जाणार आहे.

मुंबई : मुंबईविद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालयांमध्ये व शिक्षण विभागांमध्ये अ‍ॅडव्हान्स अकाउंटन्सीमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षणाला (एम.कॉम) मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. या अभ्यासक्रमासाठी यंदा तब्बल २६,२१७ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहे. त्या खालोखाल सायकॉलॉजी, बायोटेक, आयटी, बिझनेस मॅनेजमेंट, बैंकिंग अँड फायनान्स अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छित आहेत.

या पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी, २६ जूनला जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी ज्या-ज्या शैक्षणिक विभागात आणि महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज केले आहेत.

त्या-त्या ठिकाणी गुणवत्ता यादी पाहायला मिळणार आहे. यंदा १९ हजार सहा विद्यार्थ्यांनी विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १ लाख २५ हजार ३२१ एवढे अर्ज सादर केले आहेत. यामध्ये विविध संलग्नीत महाविद्यालये आणि विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागांचा समावेश आहे. विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये २०२४-२५ साठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करण्यास २२ मेपासून सुरुवात करण्यात आली होती.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता आलेले अर्ज-

पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक ८४८ अर्ज सायकॉलॉजीसाठी आले. कॉमर्ससाठी ६७९, केमिस्ट्री ६२४, आयटी ५५४, कॉम्प्युटर सायन्स ४२८, बायोटेक ४१९, कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ३४७, सिव्हिक्स अँड पॉलिटिक्स २९३, लाईफ सायन्स २८३, स्टॅटेस्टिक्स २१९, इंग्रजी २९१, पाली १५२, मॅथेमॅटिक्स १४१, हिस्ट्री १३७, जिओग्राफी १३०, फिजिक्स १२९, सोशिओलॉजी १०४, संस्कृत ९१, फिलॉसॉफी ६२ असे अर्ज आले आहेत.

टॅग्स :मुंबईविद्यापीठविद्यार्थी