मुंबई विद्यापीठाच्या विभागांचेही होणार रँकिंग; जागतिक क्रमवारीत स्थान मिळविण्यासाठी कंबर कसली 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 09:49 AM2024-09-20T09:49:09+5:302024-09-20T09:52:07+5:30

रँकिंगच्या निकषांनुसार सर्वोत्कृष्ट विभागास ५ ते २५ लाखांचे संशोधन अनुदान देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

in mumbai university departments will also be ranked waist tight to get a place in the world rankings  | मुंबई विद्यापीठाच्या विभागांचेही होणार रँकिंग; जागतिक क्रमवारीत स्थान मिळविण्यासाठी कंबर कसली 

मुंबई विद्यापीठाच्या विभागांचेही होणार रँकिंग; जागतिक क्रमवारीत स्थान मिळविण्यासाठी कंबर कसली 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) सर्वोत्कृष्ट शंभर विद्यापीठांमध्ये स्थान न मिळवू शकलेल्या मुंबईविद्यापीठाने जागतिक क्रमवारीतील विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता कंबर कसली आहे.  

विद्यापीठातील विविध विभागांत स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी एनआयआरएफ आणि क्यूएस रँकिंगच्या धर्तीवर विद्यापीठातील शैक्षणिक विभागांचे  युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क (यूडीआरएफ) जाहीर केले जाणार आहे. असे करणारे मुंबई विद्यापीठ पहिले ठरणार आहे. त्यामध्ये रँकिंगच्या निकषांनुसार सर्वोत्कृष्ट विभागास ५ ते २५ लाखांचे संशोधन अनुदान देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. 

विद्यापीठातील विज्ञान शाखेअंतर्गत १५, वाणिज्य व व्यवस्थापन, कौशल्य किंवा ऑनलाइन शिक्षण आणि आदर्श महाविद्यालये ८, मानव्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे १०, भाषा १५, आंतरविद्याशाखीय १२ आणि विविध २० अध्यासन केंद्रे असे ८० विविध विभाग कार्यरत आहेत. या सर्व विभागांसाठी एनआयआरएफ आणि क्यूएस किंवा टाइम्स रँकिंगच्या धर्तीवर तसेच नॅकच्या गुणांकन पद्धतीनुसार मूल्यांकन केले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने परिमाणात्मक मूल्यांकन प्रणाली तयार केली आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विविध विभागांना त्यांचा शैक्षणिक दर्जा, क्षमता आणि संधी अशा बाबींवर विशेष भर देता येईल. तसेच गुणवत्तावाढीसाठी प्रोत्साहन मिळेल, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी नमूद केले.

पुरस्कारांनी सन्मान-

विज्ञान वर्गवारीतून प्रथम येणाऱ्या विभागास १५ लाखांचे पुरस्कार, तर इतर विभागासाठी १० लाख, अध्यासन केंद्रासाठी ५ लाखांचा पुरस्कार दिला जाणार आहे. विज्ञान वर्गवारीतून द्वितीय क्रमांकासाठी ७ लाख, भाषा मानव्यविज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन वर्गवारीतून ५ लाख आणि अध्यासन केंद्रांसाठी २ लाखांचा पुरस्कार दिला जाईल. सर्वसाधारण सर्वोत्कृष्ट विभागास अतिरिक्त १० लाख आणि द्वितीय सर्वसाधारण विभागास ५ लाखांचे अतिरिक्त पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे.

मूल्यांकनातील महत्त्वपूर्ण बाबी-

विविध विभागांकडून राबविण्यात येणारे महत्त्वाचे संशोधन प्रकल्प, विविध सरकारी व औद्योगिक संस्थामार्फत मिळणारे अनुदान व निधी, संशोधन गुणवत्ता व स्कोपस इंडेक्स, कन्सलटन्सी, पेटेंटस, विविध शैक्षणिक सामंजस्य करार व औद्योगिक जगताशी असलेले संबंध, विभागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात केलेली उत्कृष्ट कामगिरी, माजी विद्यार्थ्यांचे सहाय, सीएएसआर व फिलॉन्थ्रॉपिक निधी आणि एक्सटर्नल पीअर पर्शेप्शन, धारणा अशा अनुषंगिक बाबींचे मूल्यांकन केले जाणार आहे. 

Web Title: in mumbai university departments will also be ranked waist tight to get a place in the world rankings 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.