मुंबई विद्यापीठामध्ये आता जॉब ऑन ट्रेनिंग; नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:53 AM2024-07-08T11:53:12+5:302024-07-08T11:56:55+5:30

विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना या केंद्रात अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

in mumbai university now job on training student will get an opportunity to work in a reputed organization  | मुंबई विद्यापीठामध्ये आता जॉब ऑन ट्रेनिंग; नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळणार 

मुंबई विद्यापीठामध्ये आता जॉब ऑन ट्रेनिंग; नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळणार 

मुंबई :  विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबईविद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील पश्चिम विभागीय उपकरण केंद्रात (डब्ल्यूआरआयसी) आता विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) घेता येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान (सायन्स ॲण्ड टेक्नाॅलॉजी)  विद्याशाखेतील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना या केंद्रात अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘हे’ मिळणार प्रशिक्षण-

१२० तासांच्या या कार्यांतर्गत प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना ऑप्टिकल मायक्रोस्कोप, अणू शोषण स्पेक्ट्रो फोटोमीटर, यूव्ही-व्हीआयएस स्पेक्ट्रो फोटोमीटर, इन्फ्रारेड स्पेक्ट्रो फोटोमीटर,  क्रोमॅटोग्राफी उपकरणे, संगणक देखभाल, इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन, ग्लास ब्लॉविंग अशा आनुषंगिक उपकरणांचे प्रशिक्षण, देखभाल व दुरुस्तीचे अनुभवाधारित शिक्षण मिळणार आहे. विज्ञान शाखेतील एमएस्सी सत्र-२ आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी या कार्यांतर्गत प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकणार आहेत.  

प्रात्यक्षिक ज्ञान...

१) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिकताना विद्यार्थ्यांना विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान, कौशल्ये आणि उदयोन्मुख क्षेत्रातील गरजा व संधीनुसार प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. 

२) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या राष्ट्रीय सुविधा केंद्राला शिक्षक आणि प्रयोगशाळेसंबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा मोठा अनुभव असून, या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांची रचना केली आहे. 

विविध उपकरणे हाताळण्याचे व अनुभवाधारित प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृद्धीस हातभार लागणार असून, रोजगारक्षमता आणि नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. पहिल्या बॅचला विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांमधील मनोबल वाढले आहे. - प्रा. शिवराम गर्जे, संचालक, डब्ल्यूआरआयसी

विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद - 

१) विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रथम वर्षाचे विद्यार्थी पश्चिम विभागीय उपकरण केंद्राबरोबरच ठाणे येथील ‘इंडियन रबर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’या नामांकित संस्थेमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगअंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत. 

दोन्ही ठिकाणी मिळत असलेल्या प्रत्यक्ष व अनुभवाधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत असून अशा प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. त्याचप्रमाणे उद्योगांशी निगडित अनुभव मिळाल्याने खऱ्या अर्थाने रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतील, असेही विद्यार्थी त्यांच्या प्रतिक्रिया देताना सांगत आहेत. 

२) पुस्तकांत शिकलेल्या विविध शास्त्रीय संकल्पनांचा कारखान्यांमध्ये होत असलेला प्रत्यक्ष उपयोग अनुभवता येत असल्याने मूलभूत संकल्पना आणखी समजण्यास मदत होत असल्याचेही विद्यार्थी सांगत आहेत. याचप्रमाणे रसायन तंत्रज्ञान संस्था येथेही कार्यांतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यांतर्गत अनुभवाबद्दल आनंद व्यक्त केला.

Web Title: in mumbai university now job on training student will get an opportunity to work in a reputed organization 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.