बेकऱ्या मुंबईकरांच्या मुळावर; इंधनासाठी लाकडाच्या वापरामुळे वायू प्रदूषणात पडते भर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:09 AM2024-08-22T11:09:54+5:302024-08-22T11:16:35+5:30
मुंबईमधील २०० बेकरींपैकी ४७.१० टक्के बेकरी या इंधन म्हणून प्रामुख्याने लाकडाचा वापर करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईमधील २०० बेकरींपैकी ४७.१० टक्के बेकरी या इंधन म्हणून प्रामुख्याने लाकडाचा वापर करतात. लॉगवूडच्या तुलनेत खूपच कमी खर्च असल्यामुळे जुन्या फर्निचरमधून मिळणारे लाकूड, जीर्ण, मोडकळीस आलेल्या इमारतींमधील लाकूड असे भंगार लाकूड (स्क्रॅप वूड) हा या बेकरींच्या इंधनाचा प्राथमिक स्रोत आहे. यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत मोठी भर पडते, असे अभ्यासासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
बेकरी क्षेत्रामुळे होणाऱ्या मुंबईतील हवा प्रदूषणाबाबतची निरीक्षणे अभ्यासाद्वारे समोर आली आहेत. बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुप यांनी केलेल्या सहा महिन्यांच्या तांत्रिक अभ्यासाद्वारे या बाबी समोर आल्या आहेत. बेकरी क्षेत्राचे स्वच्छ इंधन वापरामध्ये परिवर्तन व्हावे, यासाठी अहवालात शिफारशीही सुचविण्यात आल्या आहेत. ‘एन्व्हिजनिंग अ सस्टेनेबल बेकरी इंडस्ट्री फॉर मुंबई’ या नावाने करण्यात आलेल्या अभ्यासात एकूण २०० बेकरींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
एलपीजी, विजेचा कमी वापर -
१) लाकडापाठोपाठ वीज हे दुसऱ्या क्रमांकाचे वापरले जाणारे सर्वसाधारण इंधन असून २८.१० टक्के बेकरींमध्ये त्याचा वापर होतो.
२) एलपीजी आणि वीज असा संयुक्त वापर २०.९० टक्के बेकरींमध्ये केला जातो. तर एलपीजी, पीएनजी, डिझेल आणि संमिश्र इंधन प्रकारांचा वापर बऱ्यापैकी कमी प्रमाणात होतो.
३) अभ्यासासाठी भेट दिलेल्या आणि सर्वेक्षण केलेल्या वॉर्डांपैकी ई वॉर्डमध्ये सर्वाधिक २३ बेकरी असून, त्यापाठोपाठ बी आणि के (पश्चिम) वॉर्डमधील २१ बेकरींना भेट दिली.
४) ई वॉर्डमध्ये लाकूड आणि विजेचा वापर अनुक्रमे १२ आणि सात बेकरींमध्ये सर्वाधिक होतो. के (पश्चिम) वॉर्ड इंधनासाठी विशेषत: एलपीजीवर अवलंबून आहे, २१ पैकी १३ बेकरींमध्ये त्याचा वापर केला जातो.
२० किलो पिठासाठी पाच किलो लाकूड-
लाकडाचा वापर करणाऱ्या बेकरी दिवसाला सर्वसाधारणपणे सरासरी सुमारे १३० किलो लाकूड वापरतात. तर मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करणाऱ्या बेकरी या दिवसाला सुमारे २५० ते ३०० किलोदरम्यान लाकडाचा इंधन म्हणून वापर करतात. साधारणपणे २० किलो पिठापासून पाव करण्यासाठी चार ते पाच किलो लाकूड गरजेचे असते. भंगार लाकडाची किंमत साधारण एका किलोला चार ते पाच रुपये अशी आहे, तर लॉगवूड १० ते १२ रुपये किलो आहे. लाकूड जाळणाऱ्या बेकरींमध्ये तयार होणाऱ्या राखेची विल्हेवाट ही बहुतांशी डंपिंग ग्राऊंडवर केली जाते. परिणामी, हवा प्रदूषणात भर पडते.
या घटकांमुळे होते प्रदूषण-
१) बेकरी भट्टीमधून हानिकारक अशा प्रदूषकांचे उत्सर्जन होते. यामध्ये पार्टिक्यूलेट मॅटर, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाऊंड्स यांसारख्या प्रदूषकांचा समावेश आहे.
२) या उत्सर्जनामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. मुंबईतील बेकरींमधील इंधन वापराच्या पद्धतींची तपासणी करणे, बेकरींचे भौगोलिक वर्गीकरण करणे, स्वच्छ इंधनाचा वापर करण्यातील अडथळे जाणून घेणे आणि शाश्वत इंधन पर्याय वापराला प्रोत्साहन देण्यासाठी व्यावहारिक उपाय सुचवणे, हे या अभ्यासाचे उद्दिष्ट होते.
...अन् होतात हे आजार
लाकडाचा वापर होणाऱ्या बेकरींमधील उत्सर्जन हे पीएम १० आणि पीएम २.५ यांचे प्राथमिक स्रोत आहे. ज्यांचे सूक्ष्म कण फुप्फुसांमध्ये अगदी आतपर्यंत पोहोचत असल्यामुळे श्वसनाच्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात. भंगार लाकूड जाळल्याने तयार होणारे व्हिओसीज् हे कर्करोग, अस्थमा आणि इतर अनेक आजारांसाठी कारणीभूत असतात.