गुंतवणूक, अटकेची भीती अन् सायबर भामटे मालामाल! ज्येष्ठ नागरिक, उच्च शिक्षितांचीही फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:43 AM2024-08-12T10:43:53+5:302024-08-12T10:48:01+5:30
गेल्या पाच महिन्यांत मुंबईत सायबरशी संबंधित दोन हजार १९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शेअर मार्केटमधील गुंतवणूक, अटकेची भीती, ड्रग्ज पार्सलसह विविध क्लृप्त्या वापरत सायबर भामट्यांनी गेल्या काही दिवसांत कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला आहे. अशा गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरले आहेत. तसेच, अनेक उच्च शिक्षितही जाळ्यात अडकले आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आव्हान सायबर पोलिसांसमोर आहे. गेल्या पाच महिन्यांत मुंबईत सायबरशी संबंधित दोन हजार १९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी अवघ्या ४४२ गुन्ह्यांची उकल करत ५१२ जणांना अटक करण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.
हेल्पलाइनने वाचवले कोट्यवधी रुपये-
सायबर महाराष्ट्रने दिलेल्या माहितीनुसार, सायबर विभागाच्या १९३० या हेल्पलाइनवर दिवसाला चार ते पाच हजार फसवणुकीच्या घटनांचे फोन येत आहेत. त्याची तत्काळ दखल घेत कारवाई करण्यात येत आहे. २०२१ पासून २६ जुलै २०२४ पर्यंत दोन लाख ८१ हजार १९ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये तीन हजार ३२४ कोटींची फसवणूक झाली. फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी ३५८.७७ कोटी वाचवण्यात सायबर विभागाला यश आले आहे.
‘गोल्डन अवर्स’मध्ये साधा संपर्क-
१) खात्यातून पैसे गेल्याचे समजताच तासाभराच्या आत संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते. सायबर सेलच्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीमध्ये तीन टप्प्यांत काम चालते.
२) सध्या फसवणुकीची रक्कम बँक खात्यात जमा होताच, त्याच वेळेत दुसरीकडे काढण्यास सुरुवात होते. तर काही प्रकरणात विविध शॉपिंग संकेतस्थळावर खरेदीसाठी पैसे अडकवले जात असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईतून दिसून येत आहे.
३) अनेकदा पैसे काढण्यासाठी असलेली मर्यादा, ऑनलाइन ट्रान्सफर प्रक्रियेमुळे पैसे काढण्यास वेळ जातो. यापूर्वीच तक्रारदार पोलिस ठाण्यास आल्यास तात्काळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने संबंधित बँकेशी संपर्क साधून पैसे वाचविण्यास मदत होते.
जॉब फ्रॉड-
पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली एक लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली बँक खाते रिकामे करण्यात येत आहे. गेल्या ५ महिन्यांत जॉब फ्रॉड संबंधित पाच महिन्यांत २२४ गुन्ह्याची नोंद झाली. यापैकी अवघ्या ४८ गुन्ह्यांची उकल करत ५७ जणांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यांनी वाढवली डोकेदुखी...
१) शेअर्स मार्केट गुंतवणूक-बड्या कंपन्यांच्या नावाखाली शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल मीडियावरून किंवा एखाद्या ग्रुपमध्ये ॲड करून गुंतवणुकीतील नफ्याचे जाळे पसरवले जाते.
२) सावज जाळ्यात अडकताच त्यांना सुरुवातीला नफ्याची रक्कम देत जास्तीचे पैसे गुंतविण्यास भाग पाडतात. त्यानंतर पैसे काढून गुंतवणूकदाराला ग्रुपमधून डीलिट करून कोट्यवधींच्या रुपयांवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पोलीस गणवेशात व्हिडीओ कॉल -
तुमचे ड्रग्ज पार्सल पकडल्याचे सांगून अटकेची भीती दाखवली जाते. त्यानंतर, मुंबई पोलिसांसह विविध राज्यांतील पोलिस, कस्टम, ईडी, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून जाळ्यात ओढले जाते. खात्यातील रकमेची तपासणी करण्याच्या नावाखाली सर्व रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पडून फसवणूक केली जाते. यामध्ये पोलिस गणवेशात व्हिडीओ कॉल करून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले आहेत.