पेट्रोलपेक्षाही आता भाज्या महाग! आवक घटली; दर शंभरी पार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:48 AM2024-06-28T09:48:57+5:302024-06-28T09:53:03+5:30
सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. अनेक भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत.
मुंबई : सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. अनेक भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. त्यामुळे या भाज्या प्रतिकिलो एक लिटर पेट्रोलच्या किमतीलाही मागे टाकत आहेत. तेव्हा आता नेमकं खायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
मुंबई शहरात (महाराष्ट्र) पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रतिलिटर आहे. मुंबई शहरात सलग ३ महिन्यांपासून दरात कोणताही बदल झालेला नाही. शेवग्याच्या शेंगाचा दर प्रतिकिलो १६० ते २०० रुपये झाला आहे. तर एका शेंगेचा दर हा १५ ते २० रुपये आहे. त्यामुळे हा दर सामान्य माणसाच्या खिशाला परवडण्यासारखा नाही. टोमॅटो आणि भेंडी ही प्रतिकिलो ८० ते १०० रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे भाजीत किंवा आमटीत टोमॅटो घातल्याशिवाय जेवण घशाखाली न उतरणार यांचे वांदे होणार आहेत. भाजीवाल्याकडून वेगवेगळ्या भाज्या खरेदी केल्यानंतर कोथिंबीर कॉम्प्लिमेंटरी मागायची गृहिणींची सवय असते. मात्र, ही कोथिंबीरीही महागल्याने कमीत कमी १० रुपये मोजूनच ती खरेदी करावी लागत आहे.
प्रिझर्व्हेशनचा पर्याय-
भाज्याच्या हंगामात विशिष्ट पद्धत वापरत टोमॅटो, मटार, ो, फरसबीसारख्या अनेक भाज्या विशिष्ट प्रकारच्या पिशव्या वापरून त्या फ्रीजरमध्ये प्रिझर्व्ह करता येतात. त्यामुळे सीजन नसल्याने महाग होणाऱ्या भाज्यांचा आनंद आपल्याला उपभोगता येतो.- वैशाली टोके, गृहिणी.
पालेभाज्याही परवडेनात-
१) मोठी मेथी - ४० ते ८० रु.
२) पातीचा कांदा - ४० ते ६० रु.
३) लहान मेथी - ४० ते ६० रु.
४) पालक - २५ ते ४० रु.
५) कोथिंबीर - १५० ते २०० जुडी रु.