Join us  

'कोस्टल'च्या वर्सोवा ते दहिसर टप्प्याला वेग; प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 11:19 AM

सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतची मार्गिका मुंबई महापालिकेने अंशतः खुली केली आहे.

मुंबई : सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतची मार्गिका मुंबई महापालिकेने अंशतः खुली केली आहे. दुसरीकडे वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासाठी पालिकेची तयारी सुरू आहे. हा मार्ग पुढे गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालाही जोडण्यात येणार आहे. त्यात एकूण सहा पॅकेज असून पॅकेज 'सी' मध्ये माइंडस्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडे जाणारा बोगदा आणि पॅकेज 'डी'मध्ये चारकोप ते माइंडस्पेस दक्षिणेकडे जाणारा समांतर बोगद्याच्या समावेश आहे. पालिकेने यासाठीही प्रकल्प व्यवस्थापनासाठी सल्लागारासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

पालिकेने फेब्रुवारी २०२४ मध्ये यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा पालिकेकडून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी पालिकेने उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधण्यावर भर दिला आहे. त्यानुसार मरिन लाइन्स ते वरळी या कोस्टल रोडचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये हाती घेतले. सद्यःस्थितीत हे काम अंतिम टप्प्यात आहे. मरिन लाइन्स ते थेट दहिसर भाईंदरपर्यंत जाता यावे, यासाठी कोस्टल रोड प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्प सहा टप्प्यांत होणार असून, तो गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली. वर्सोवा ते दहिसर हा एकूण १८.४७ किलोमीटरचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी रचना आहे. 

सहा टप्प्यांसाठीअसे आहे कामाचे स्वरूप-

वर्सोवा ते दहिसर या मार्गासाठी सहा भाग केले आहेत. त्यात वर्सोवा ते बांगूरनगर, बांगूरनगर ते माइंडस्पेस मालाड, माइंडस्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडे जाणारा बोगदा, चारकोप ते माइंडस्पेस दक्षिणेकडे जाणारा समांतर बोगदा, चारकोप ते गोराई आणि गोराई ते दहिसर ते भाईदर असे सहा टप्प्यांत हे काम करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

कोस्टल रोडचे वर्सोवा ते दहिसर टप्प्यातील पॅकेजेस-

१) पॅकेज ए: वर्सोवा ते बांगूर नगर, गोरेगाव ४.५ किमी

२) पॅकेज बी: बांगूर नगर ते माइंडस्पेस, मालाड १.६६ किमी

३) पॅकेज सी आणि डी: उत्तर आणि दक्षिणेकडे जाणारा सव्र्व्हिस रोड,मालाड माइंडस्पेस ते चारकोप कांदिवली ३.६६ किमी

४) पॅकेज ई: चारकोप ते गोराई ३.७८ किमी

५) पॅकेज एफ: गोराई ते दहिसर ३.६९ किमी

वेगवेगळे कंत्राटदार नेमले आहेत. या प्रत्येक टप्प्याचे काम सुमारे पाच हजार कोटींचे आहे. यापैकी बांगूरनगर ते माइंडस्पेस मालाड या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला ४.४६ कि.मी.चा एक उन्नत जोड देण्यात येणार असल्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकारस्ते वाहतूकवर्सोवादहिसर