मुंबई :मुंबईसह महानगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र, मध्य आणि हार्बर मार्गांवरील स्थानकांवर पाणी साचू नये, यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानंतर अनेकदा पॉइंट फेल होतात. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. पॉइंट मशीनमध्ये पाणी शिरणे तसेच केबलमध्ये बिघाड, पॉइंट मशीन खराब होणे आणि इनडोअर सर्किट नादुरुस्त होणे, हे घटक त्यास कारणीभूत ठरतात. पूर परिस्थितीत एकाच वेळी अनेक बिघाड होत असत. त्यामुळे रेल्वेकडून पॉइंट मशीन अद्ययावत करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेवरील पाणी साचणाऱ्या (पूरप्रवण) २३१ ठिकाणी हा बदल करण्यात आला आहे. पॉइंट मशीनच्या डिव्हाइसमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या संपर्कामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका कमी झाला आहे.
इतर उपाययोजना-
१) साचलेले पाणी उपसण्यासाठी १९२ पंप सज्ज
२) विक्रोळी-कांजूरमार्ग, कांजूरमार्ग आणि शीव येथे आणखी तीन ठिकाणी लहान बोगदा.
३) कुर्ला-ट्रॉम्बे, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि टिळकनगर येथे १५६ कल्व्हर्टची स्वच्छता.
४) ओव्हरहेड वायर जवळील सहा हजारांहून अधिक झाडांच्या फांद्या छाटल्या.
५) १६ हजार इन्सुलेटरची सफाई.