मुंबई : मुंबईत व्हीआयपी संस्कृती फोफावता कामा नये, मग तो कोणीही असो. या उलट प्रत्येक मुंबईकरच ‘व्हीआयपी’ असायला हवा असा. त्यामुळे येत्या आठवड्यापासून कोस्टल रोड पूर्ण वेळ सामान्य मुंबईकरांसाठी खुला करावा, अशी मागणी करणारे पत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिले आहे.
कोस्टल रोडची नव्याने खुली झालेली उत्तर वाहिनी मार्गिका ही कोस्टल रोडच्या छोट्या कामांसाठी आठवड्यातील शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, १६ जूनला कोस्टल रोड बंद असताना व्हीआयपींच्या ताफ्यासाठी तैनात वाहतूक पोलिसांनीच ताफ्याला प्रवेशाची सोय करून दिली आणि ताफा जाताच हा रस्ता मुंबईकरांसाठी पुन्हा बंद केला. यामुळे कोस्टल रोड सामान्यांसाठी बंद असताना व्हीआयपींसाठी खुला का करण्यात आला, याचे स्पष्टीकरण त्यांनी पालिकेकडून मागितले आहे.
१० जून रोजी कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीचे उद्घाटन करून ११ जून रोजी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, हा मार्ग सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजे १६ तासांच्या कालावधीसाठी वाहतुकीला नियमितपणे खुला करण्यात आला असून, दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरू असते.
कारवाई व्हावी-
पालिकेकडून व्हीआयपी ताफ्याला परवानगी का दिली याचे स्पष्टीकरण द्यावे आणि ज्या अधिकाऱ्यांनी या कृतीला परवानगी दिली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. याशिवाय पुढील आठवड्यापासून संपूर्ण मार्गच सामान्यांसाठी खुला करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
१) शनिवार व रविवार, असे दोन दिवस प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्णत्वास नेणे सोयीचे व्हावे, यासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे.
२) मात्र, रविवारी तो व्हीआयपींसाठी खुला करण्यात आला. अशाने मुंबईत कधीच नसलेली ‘व्हीआयपी संस्कृती’ तर अवतरेलच, शिवाय व्हीआयपी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा जीवही धोक्यात येईल, अशी भीती ठाकरे यांनी व्यक्त केली.