सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसाठी 'VJTI' तज्ज्ञ सल्लागार; ३ पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:48 AM2024-09-24T10:48:25+5:302024-09-24T10:56:09+5:30
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील अमर महाल, कुर्ला कलिना व डबलडेकर उड्डाणपुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी 'व्हीजेटीआय'ची तज्ज्ञ सल्लागार म्हणून पालिकेकडून नियुक्ती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील अमर महाल, कुर्ला कलिना व डबलडेकर उड्डाणपुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी 'व्हीजेटीआय'ची तज्ज्ञ सल्लागार म्हणून पालिकेकडून नियुक्ती केली आहे. व्हीजेटीआय ही सरकारमान्य शैक्षणिक संस्था असून त्यांना अशा कामांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सर्वेक्षणासाठी कोणतीही सार्वजनिक निविदा न मागवता व्हीजेटीआयची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी ३३ लाख ३२ हजार इतके शुल्क आकारले जाणार आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीएने बांधलेल्या या जोडरस्त्याची १२ वर्षांतच संरचनात्मक तपासणी करावी लागणार आहे.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड हा २०१२ पासून वाहतुकीसाठी खुला केला होता परंतु, आजमितीस या रोडवर कोणत्याही दुरुस्तीचे काम हाती घेतलेले नव्हते. यासंदर्भात रेल्वे प्राधिकरण आणि एम पश्चिम विभागातील कर्मचाऱ्यांनी जुलै २०२१ मध्ये सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची पाहणी केली.
पाहणीदरम्यान लिंक रोडवरील उड्डाणपुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे असे सांगितले. या पार्श्वभूमीवर सांताक्रूझ चेंबूर उड्डाणपुलाच्या लिंकरोड स्थितीचे मूल्यांकनासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून व्हीजेटीआय यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती प्रस्तावित केली होती.
अंधेरी पुलाचाही वाद-
पुलांची संरचनात्मक तपासणी ही पुलाचे बांधकाम झाल्यानंतर २५ वर्षांनी केली जाते. मात्र या पुलांची १२ वर्षातच तपासणी करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला व एमएमआरडीएने पालिकेकडे हस्तांतरित केलेल्या अंधेरी येथील पुलाचाही वाद सुरू आहे. या पुलाची दुरुस्ती करावी लागणार असून पालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे.
तुळईला तडे, पाइप तुटले-
१) मार्गावरील तीन उड्डाणपुलांपैकी सीएसएमटी रोड उड्डाणपूल हा ३.४५ किमी लांबीचा मुख्य उड्डाणपूल आहे.
२) एलबीएस मार्गावर ५६० मीटर लांबीचा कुर्ला-कलिना उड्डाणपूल आणि १.८ किमी लांबीचा दुहेरी स्तरांचा (डबल डेकर) उड्डाणपूल असे तीन उड्डाणपूल आहेत.
३) या उड्डाणपुलांचे युपीव्हीसी पाइप तुटले आहेत, तुळईला तडे गेले आहेत, पदपथांची दुरवस्था झाली आहे, असे पाहणीवेळी आढळून आले होते.
४) या उड्डाणपुलांचे युपीव्हीसी पाइप तुटले आहेत, तुळईला तडे गेले आहेत, पदपथांची दुरवस्था झाली आहे, असे पाहणीवेळी आढळून आले होते.
५) त्यामुळे पालिकेने आता या पुलांची संरचनात्मक तपासणी करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर पुलांची मोठी दुरुस्ती करायची की डागडुजी करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.