लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कांजूर मार्ग येथील खार जमिनीवर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा घाट घातला जात असताना आता वडाळा येथील खार जमिनीही संकटात आल्या आहेत. सीआरझेड - १ मध्ये येणाऱ्या या जमिनीवर २०१९ सालापासून अतिक्रमण होत असून, येथे मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जात आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
‘वनशक्ती’ या पर्यावरणविषयक संस्थेचे संचालक आणि पाणथळ जतन समितीचे सदस्य दयानंद स्टालिन यांनी येथील खार जमिनीवरील अतिक्रमणाबाबत विविध सरकारी यंत्रणांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, आता या तक्रारींची सरकारी यंत्रणांनी दखल न घेतल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा स्टालिन यांनी दिला आहे.
चार वर्षांत हरित पट्टा झाला नाहीसा-
१) वडाळा येथे कायदा आणि सुव्यवस्थेचे सर्रास उल्लंघन होत असून, पाणथळ जागा आणि तिवरांची जागा झपाट्याने नष्ट केली जात आहे. गेल्या चार वर्षांपासून येथील तिवरांवर बेकायदा भराव टाकला जात आहे. २०१९ साली पहिल्यांदा तक्रार करण्यात आली होती. तरीही हे उद्योग अजून सुरूच आहेत.
२) उपग्रह छायाचित्रे, ‘गुगल अर्थ’द्वारे तपासणी केल्यास या जागेवर गेल्या चार वर्षांत झालेले बदल स्पष्ट दिसतात. चार वर्षांपूर्वी येथे हरित पट्टा होता, तो आता नाहीसा झाल्याचे त्यात उघड होते, असेही स्टालिन यांनी नमूद केले.
३) ‘गुगल अर्थ’द्वारे चार वर्षांपूर्वी टिपलेल्या छायाचित्रात वडाळा येथील हरित पट्टा स्पष्ट दिसत होता. अलीकडे टिपलेल्या छायाचित्रात हा हरित पट्टा गायब झाल्याचे दिसत आहे.