लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मशीद बंदर स्थानकांदरम्यानच्या सुमारे १५० वर्षे जुन्या कर्नाक पुलाचे काम आधीच खूप रखडले असताना आता त्याचा गर्डर बसवण्यासाठी महापालिकेला रेल्वेकडून सहा तासांच्या मेगाब्लॉकची प्रतीक्षा आहे. मात्र मेगाब्लॉक पावसाळ्यात दिला जात नसल्याने या पुलाचे काम लांबणीवर पडणार आहे.
या पुलाचा एक गर्डर तयार आहे. मात्र पावसाळ्यात रेल्वे मेगाब्लॉकला परवानगी देत नाही. त्यामुळे दोन्ही गर्डर बसवल्यानंतर हा पूल पुढच्या वर्षअखेरीस वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्नाक पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो नोव्हेंबर २०२२ मध्ये पाडण्यात आला. त्याच्या बांधकामाला २०२३ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्याच्या गर्डरचे सुटे भाग गेल्या महिन्यात मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर तुळईची जोडणी पूर्ण झाली असून, रेल्वेमार्गाच्या पूर्वेला गर्डर बांधून तयार आहे. गर्डर रेल्वेमार्गांवर बसवण्यासाठी मुंबई महापालिकेने रेल्वेकडे मेगाब्लॉकची मागणी केली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने त्याला परवानगी दिलेली नाही.
किती तासांच्या ब्लॉकची गरज?
महापालिकेने रेल्वेकडे सहा तासांच्या ब्लॉकची मागणी केली आहे. महापालिकेला ब्लॉक दिवसा हवा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र पावसाळ्यात या कामासाठी रेल्वे ब्लॉक देत नाही. त्यामुळे पावसाळा संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे गर्डर बसवण्याचे काम ऑक्टोबरमध्येच होण्याची शक्यता आहे.
५५० मेट्रिक टन गर्डर -
गर्डर बसवण्याचे हे काम अत्यंत जोखमीचे असल्यामुळे पावसाळ्यानंतरच रेल्वेकडून ब्लॉक मिळेल, असे सांगितले जाते. ७० मीटर लांब आणि ९.५ मीटर रुंद गर्डरचे वजन सुमारे ५५० मेट्रिक टन आहे. त्यानंतर दुसरी तुळई जोडली जाईल. ती बसवण्याचे काम मार्च २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.