Join us

दहा दिवसांत कोसळला नाहीतर तोंडचे पाणी पळणार! मुंबई, ठाणे, पालघरवर जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 10:25 AM

जुलै महिना उजाडला तरीही पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नसल्याने धरणाच्या पाणी साठ्यात गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांची घट झाली आहे.

पंडित मसणे, मुंबई : जुलै महिना उजाडला तरीही पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नसल्याने धरणाच्या पाणी साठ्यात गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांची घट झाली आहे. येत्या १५ जुलैपर्यंत धो धो पाऊस कोसळला नाही तर मुंबईठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाणीकपातीपासून अनेक गंभीर निर्णयांची टांगती तलवार मोठ्या लोकसंख्येच्या डोक्यावर आहे.

धरणांमध्ये दरवर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस होऊन १५ जुलैपर्यंत ८० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झालेला असतो. जुलैअखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणे ओव्हरफ्लो होतात. जूनच्या सुरुवातीला पाऊस आला. पण उर्वरित दिवस कोरडेच गेले. जुलै महिना उजाडला तरी धरण क्षेत्रात पावसाची उघडीप आहे. धरण परिसरात ऊन पडलेले असते. येत्या १५ जुलैपर्यंत धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यास मुंबई व ठाण्यातील किमान दोन ते सव्वादोन कोटी लोकांच्या तोंडचे पाणी पळून जाईल.

एवढाच पाणीसाठा शिल्लक- 

१) ठाणे, मुंबई शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या भातसा धरणात सध्या २६.७१ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणात ३१.७१ टक्के पाणीसाठा होता. 

२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या २६.९४ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याच दिवशी ३४.८६ टक्के पाणीसाठा होता.

३) मुंबई व ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणात सध्या १९.८७ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी या धरणात ४१ टक्के पाणीसाठा होता. मोडकसागरमध्ये यंदा २४.४५ टक्के जलसाठा असून मागील वर्षी ४५.१७ टक्के जलसाठा होता. मध्य वैतरणात यंदा १४.९९ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याच दिवशी २५.५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. 

४) पालघर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या मुंबईसह वसई, पालघर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी धरणात सध्या २३.६५ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याच दिवशी ३४.७३ टक्के पाणीसाठा होता. कवडास धरणामध्ये यंदा ४४.७८ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी १०० टक्के पाणीसाठा होता तर वांद्री धरणात यंदा ४६.६० टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ६६.९५ टक्के पाणीसाठा होता.

टॅग्स :मुंबईठाणेपालघरपाणीकपातमोसमी पाऊस