मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) रुरकी या संस्थेच्या तज्ज्ञांनी जलाशयाची ३ आणि ४ जूनला पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी या जलाशयाच्या पुनर्बांधणीऐवजी तो दुरुस्त केला जाऊ शकतो. मात्र, दुरुस्ती काळात संबंधित कप्प्यातील पाणीसाठा वापरला जाऊ शकत नाही, असे निष्कर्ष तोंडी सांगितले. परंतु, याच्या तपशीलवार अहवाल ‘आयआयटी रुरकी’च्या तज्ज्ञांकडून अपेक्षित होता. मात्र, महिना उलटूनही अद्याप तो प्राप्त न झाल्याने या जलशयासंबंधी कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती संदर्भात बहुप्रतीक्षित असा अंतिम अहवाल ५ मार्चला मुंबई ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनी दिला. मात्र, आठ सदस्यांच्या समितीने दोन वेगवेगळे अहवाल दिले. ‘आयआयटी’च्या सदस्यांनी पर्यायी जलाशय बांधून, मग सध्याचे जलाशय रिकामे करून त्याची संरचनात्मक तपासणी आणि दुरुस्तीची शिफारस केली आहे. मात्र, अन्य चार सदस्यांना ही शिफारस मान्य नसल्यामुळे अंतिम अहवालानंतरही या विषयाचा गुंता कायम आहे. त्यानंतर पालिकेने ‘आयआयटी रुरकी’ची मदत घेण्याचे ठरले. मात्र, या संस्थेने पाहणीनंतर अद्याप अहवाल दिला नसल्याचे कळते.
अंतर्गत दुरुस्ती किती काळ टिकेल?
१) आधीच्या अहवालात सुचविल्याप्रमाणे अगाेदर दुसऱ्या ठिकाणी नवीन जलाशयाची टाकी बांधणे शक्य आहे का? त्याचा किती उपयोग करता येईल? मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल का? या बाबींचा अभ्यास आवश्यक आहे. या आधी ज्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे, अशा तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे पालिकेने ठरविले आहे. याशिवाय जलाशयाची अंतर्गत दुरुस्ती जरी करायची झाली तरी ती किती काळ टिकेल? याचाही विचार करायला हवा. त्याकरिता पालिका ‘रुरकी’ची मदत घेत आहे.