Join us  

वडाळा-कासारवडवली मेट्रो कारशेड जागेची प्रतीक्षाच; मार्गिकेचे ७१ टक्के काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:55 AM

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची ७१ टक्के स्थापत्य कामे, तर कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेची ७५.६४ टक्के स्थापत्य कामे पूर्णत्वास गेली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची ७१ टक्के स्थापत्य कामे, तर कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेची ७५.६४ टक्के स्थापत्य कामे पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात अद्यापही या कारशेडची जागा आलेली नाही. त्यातून मार्गिकेचे काम पूर्ण झाले तरी कारशेडविना मेट्रो मार्गिका सुरू होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

वडाळा ते कासारवडवली या ३२.३२ किलोमीटर मार्गिकेच्या उभारणीचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. तर मेट्रो ४ अ ही २.७ किमी लांबीची मार्गिका असेल. या दोन्ही मार्गिकांवर मिळून ३२ स्थानके असतील. मेट्रो ४ मार्गिकेसाठी १४ हजार ५४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पाच टप्प्यांत काम सुरू आहे. मेट्रो ४ मार्गिकेसाठी कांजूरमार्ग येथे एकत्रित कारशेड उभारण्यात येणार होती. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वादात कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी मिळू शकली नाही. परिणामी ही कारशेड मोघरपाडा येथे हलविण्यात आली. मोघरपाडा येथील सरकारी जागेवर सुमारे १६१ शेतकरी बाधित होत आहेत. यातील भाडेतत्त्वावर जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना २२.५ टक्के विकसित भूखंड, तर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना १२.५ टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 मात्र मोघरपाड्याच्या जागेच्या अधिग्रहणाची प्रक्रिया अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे ही जागा अद्यापही एमएमआरडीएच्या ताब्यात आली नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, एमएमआरडीएने कारशेडच्या कामासाठी यापूर्वीच कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. मात्र, जागेअभावी प्रत्यक्षात कामाला सुरूवात झालेली नाही. आता पुढील पंधरा दिवसात ही जागा ताब्यात येईल, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, सध्या या मेट्रो मार्गिकेच्या दोन पॅकेजमधील १७ किमी लांबीच्या मार्गावर ट्रॅक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एमएमआरडीएने या मेट्रो मार्गिकेच्या कामाला एप्रिल २०१८ मध्ये सुरूवात केली होती. त्यावेळच्या नियोजनानुसार ऑक्टोबर २०२२ मध्ये ही मेट्रो मार्गिका सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना आणि मेट्रो कारशेडच्या जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने मार्गिकेला विलंब झाला. 

१) मेट्रो ४ लांबी- ३२.३ किमी, स्थानके- ३० 

२) मेट्रो ४ अ लांबी- २.७, स्थानके- २ 

दोन वर्षाचा कालावधी?

दोन पॅकेजमधील कंत्राटदार बदलण्याची वेळ एमएमआरडीएवर आली. आता कारशेडची जागा ताब्यात आल्यानंतरही दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातून मेट्रो मार्गिका सुरू होण्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो