Join us

ऐन उन्हाळ्यात शहरात पाणीबाणी; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युतपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:50 AM

पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला होणारा वीजपुरवठा सोमवारी सकाळी १० वाजता खंडित झाला.

मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला होणारा वीजपुरवठा सोमवारी सकाळी १० वाजता खंडित झाला. त्यामुळे जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडली. ही यंत्रणा बंद झाल्याने पिसे येथून पंम्पिंग केले जाणारे पाणीदेखील थांबवावे लागले. पालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ११ वाजण्याच्या सुमारास पर्यायी वीजपुरवठा सुरू केला. यामुळे पश्चिम उपनगर आणि शहर भागात अनेक ठिकाणी पाणी कपात झाली.

वीज बिघाडाच्या कालावधीत तसेच बंद पडलेली यंत्रणा पूर्वपदावर येईपर्यंत संतुलन जलाशये, तसेच सेवा जलाशयांमध्ये आवश्यक असलेला पाणीपुरवठा होत नसल्याने त्यातील पाणी पातळी खालावली आहे. तसेच मुख्य जलवाहिन्या रिक्त झाल्या होत्या. पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पंप कार्यान्वित केल्यानंतर संतुलन जलाशये, सेवा जलाशयांमधील जलसाठा पातळी पूर्ववत करणे, जलवाहिन्या योग्य दाबाने चार्ज करणे  या प्रक्रियेला काही अवधी लागणार आहे. 

या सर्व तांत्रिक कारणांमुळे पांजरापूर येथून मुंबई-१ आणि मुंबई-२ या मुख्य जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबई-१ या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पश्चिम उपनगरे, तसेच शहर विभागातील जी दक्षिण, जी उत्तर, ए विभाग आदी परिसरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पुढील २४ तासांसाठी १० टक्के पाणी कपात करावी लागणार आहे. 

२४ तास पाणीसंकट-

१)  मुंबई-२ या मुख्य जलवाहिनीद्वारे पूर्व उपनगरे, शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण, ई बी परिसरांत २४ तास २० टक्के पाणी कपात होणार आहे. कंपनीकडून पडघा १०० केव्ही वीज उपकेंद्र-पांजरापूर ३ - अ  १०० केव्ही वीज उपकेंद्र या मार्गावर बिघाड कुठे झाला, याचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :मुंबईपाणी टंचाईपाणीकपात