गुड न्यूज! पाणीसाठा ३० टक्क्यांवर; धरण क्षेत्रांत पावसाचा जोर, मुबलक पाण्यासाठी प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 09:39 AM2024-07-15T09:39:11+5:302024-07-15T09:40:33+5:30
गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या दमदार पावसामुळे अवघ्या १० दिवसांत १४ जुलै रोजी पाणीसाठा २९.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई : मुंबईकरांना एक गुड न्यूज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ४ जुलै रोजी ८.५९ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या दमदार पावसामुळे अवघ्या १० दिवसांत १४ जुलै रोजी पाणीसाठा २९.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागच्या १० दिवसांत मुंबईच्या पाणीसाठ्यात २१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
मागच्या वर्षी १४ जुलै रोजी इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. तर १४ जुलै २०२२ रोजी पाणीसाठा तब्बल ६५ टक्के इतका होता. दरम्यान, पाणीसाठ्यातील वाढ दिलासा देणारी असली तरी तूर्तास पालिका प्रशासनाकडून पाणी कपात मागे घेतली जाणार नसल्याने मुंबईकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
पालिका क्षेत्रातील पवई तलाव ८ जुलै रोजी पूर्ण भरून वाहू लागला आहे. ५४५ कोटी लिटर एवढी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरले जाते. तुळशी तलावही ७६ टक्के भरला असून, तोही येत्या काही दिवसांत भरून वाहू लागेल अशी अपेक्षा आहे.
आतापर्यंत शून्य टक्क्यांवर असणाऱ्या अप्पर वैतरणाच्या धरण क्षेत्रात आतापर्यंत ६३१ मिमी पाऊस झाल्याने त्याचा पाणीसाठा जवळपास दोन टक्क्यांवर आला आहे.
मुंबईच्या ७ जलाशयांतील पाणीसाठा-
१) अप्पर वैतरणा
पाणीसाठा- ४,३१९
टक्के - १. ९०
२) मोडक सागर
पाणीसाठा-५८,९३७
टक्के-४५. ७१
३) तानसा
पाणीसाठा-८८,२७६
टक्के-६०. ८५
४) मध्य वैतरणा
पाणीसाठा-५२,३८०
टक्के-२७. ०७
५) भातसा
पाणीसाठा-२,०५,७६५
टक्के-२८. ७०
६) विहार
पाणीसाठा- १४,४२४
टक्के- ५२. ०८
७) तुळशी
पाणीसाठा-६,१५८
टक्के- ७६. ५४