दादर ते करी रोड परिसरात ठणठणाट; जलवाहिनीची दोन दिवस डागडुजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 09:36 AM2024-09-25T09:36:31+5:302024-09-25T09:41:10+5:30
सलग १९ तास चालणाऱ्या या कामामुळे ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील दादर येथील सेनापती बापट मार्ग येथे गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी ५ दरम्यान तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. सलग १९ तास चालणाऱ्या या कामामुळे ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
या परिसराला बसणार फटका-
१) ‘जी दक्षिण’ : करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ, डिलाईल मार्ग, बी.डी.डी. चाळ परिसराचा पाणीपुरवठा बंद राहील.
२) ‘जी दक्षिण’: एन. एम. जोशी मार्ग, बीडीडी चाळ परिसराचा पाणीपुरवठा बंद राहील.
३) ‘जी दक्षिण’ : संपूर्ण प्रभादेवी, आदर्श नगर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, मराठे मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग परिसराचा पाणीपुरवठा अंशत: (३३ टक्के) बंद राहील.
४) ‘जी उत्तर’ : सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग परिसराचा पाणीपुरवठा अंशत: (३३ टक्के) बंद राहील.