मुंबई : पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहीसर दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बीकेसी, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिमेला एस. व्ही. रोड, लिंक रोड नेहमीच जाम असतो. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी एक तास लागत असल्याने प्रवासी आणि चालक त्रस्त होत आहेत.
महापालिकेची ऑक्टोबर ते जून दरम्यान कामे चालू असतात. ही कामे आता तर नित्याची झाली आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते मे महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना डोकेदुखी होते. सकाळी आणि संध्याकाळी पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी गुंदवली ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ओव्हरीपाडापर्यंत मेट्रोने प्रवास करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष घालून वाहतूक कोंडीची कारणे शोधून दूर करावी, अशी मागणी पश्चिम उपनगरातील नागरिकांकडून होत आहे.
वांद्रे पूर्व-पश्चिम ते थेट दहीसर पूर्व, पश्चिम परिसरात ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत रस्ते, रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांची कामे मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामामुळे सध्या नागरिक, प्रवासी, चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. - उदय चितळे, अध्यक्ष, गोरेगाव प्रवासी संघ
अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ यावेळेत दिलेली परवानगी, मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने अवजड वाहने चालवणे, रस्त्यांवर असलेले पार्किंग, आणि उबेर कॅबना अमर्यादित परवानग्या देणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालिका, वाहतूक अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांची समिती गठीत करून वाहतूक कोंडी सोडवावी.-ॲड. गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन