पश्चिम रेल्वे शुक्रवारपासून पूर्वीच्याच वेगाने; निर्बंध बुधवारपासून काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:01 AM2024-10-01T11:01:20+5:302024-10-01T11:02:59+5:30
पश्चिम रेल्वेच्या नवीन सिग्नलिंग प्रणालीची चाचणी घेण्यासाठी या स्थानकांदरम्यान चारही ट्रॅकवर सर्व रेल्वे गाड्या फक्त ३० किमी प्रतितास वेगाने चालविण्याची परवानगी दिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून, त्यासाठी राम मंदिर-गोरेगाव- मालाडदरम्यान सोमवारपासून लावण्यात आलेले वेगाबद्दलचे निर्बंध बुधवारपासून काढण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या नवीन सिग्नलिंग प्रणालीची चाचणी घेण्यासाठी या स्थानकांदरम्यान चारही ट्रॅकवर सर्व रेल्वे गाड्या फक्त ३० किमी प्रतितास वेगाने चालविण्याची परवानगी दिली होती. पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून सुरू झालेल्या या निर्बंधांमुळे सर्व गाड्या १५
मिनिटांच्या उशिराने चालत होत्या. याबद्दल प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. काहींनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त करत पश्चिम रेल्वेवर टीका केली होती.
निर्बंधामुळे अनेक गाड्या रद्द-
१) याबद्दल स्पष्टीकरण देताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेने सिग्नलिंग यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी फेसेसमध्ये लावलेल्या निर्बंधामुळे अनेक गाड्या रद्द होणार आहेत.
२) बुधवारपर्यंत हे निर्बंध काढण्यात येणार असल्याने ट्रेन रद्द होण्याची संख्या आता ६०-७० पर्यंत येणार आहे.
४ ऑक्टोबरनंतर पूर्वपदावर-
१) ४ ऑक्टोबरपर्यंत सर्व निर्बंध हटवण्यात येणार असल्याने ब्लॉक कालावधी वगळता दिवसभरात कोणतीही सेवा रद्द न करता सर्व उपनगरीय सेवा शुक्रवारपासून सामान्य केल्या जातील.
२) गोरेगाव ते कांदिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी या आठवड्याच्या शेवटी अंतिम आणि मोठा ब्लॉक हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.