पश्चिम रेल्वे पावसाळ्यात सुपरफास्ट ! मान्सूनपूर्व बहुतांशी कामे पूर्ण, प्रशासनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 09:45 AM2024-06-10T09:45:22+5:302024-06-10T09:47:12+5:30
ऐन पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा बंद पडू नये म्हणून पश्चिम रेल्वे सज्ज झाली आहे.
मुंबई : ऐन पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा बंद पडू नये, यासाठी बहुतांशी मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.
विशेषत: रुळांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येणार असून, हवामानाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी हवामान विभागासह मुंबई महापालिकेच्या यंत्रणांशी समन्वय राखला जाईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
ड्रोनद्वारे सर्वेक्षण-
कल्व्हर्ट आणि नाल्यांमधील चोक पॉइंट्सचे निरीक्षण, स्वच्छता आणि ओळखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण केले जात आहे. बोरीवली, विरार विभागातील नाल्यांच्या सफाईसाठी ड्रोन सर्वेक्षण आणि देखरेखीचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल.
कल्व्हर्ट, नाल्यांची साफसफाई आणि गाळ काढणे, रुळांच्या बाजूने घाण काढणे, कचरा साफ करणे, अतिरिक्त जलमार्ग बांधणे, उच्च क्षमतेच्या पंपांची तरतूद करणे, झाडांची छाटणी करणे इत्यादी कामे मिशन मोडवर पूर्ण होत आहेत.- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
कल्व्हर्ट, नाल्यांची साफसफाई आणि गाळ काढणे, रुळांच्या बाजूने घाण काढणे, कचरा साफ करणे, अतिरिक्त जलमार्ग बांधणे, उच्च क्षमतेच्या पंपांची तरतूद करणे, झाडांची छाटणी करणे इत्यादी कामे मिशन मोडवर पूर्ण होत आहेत.- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
नालेसफाई वेगात -
१) १.५० लाख घनमीटर राडारोडा हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम विशेष अशा डेब्रिज स्पेशल गाड्या, बीआरएन, जेसीबी, पोकलेनच्या मदतीने करण्यात आले.
२) कल्व्हर्ट आणि नाल्यांच्या साफसफाईचे काम वेगाने पूर्ण होत आहे. यार्डातील पाण्याच्या प्रवाहाच्या पद्धतीचा अभ्यास करून पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी नवीन नाले बांधण्यात येत आहेत.
३) वांद्रे आणि बोरीवली येथील कल्व्हर्टची स्वच्छता करण्यासाठी डी-स्लडिंग मशीनचा वापर करण्यात आला.
४) प्रभादेवी-दादर सेक्शन, दादर-माटुंगा रोड सेक्शन, वांद्रे टर्मिनस यार्ड, गोरेगाव-मालाड सेक्शन, बोरीवलीत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १२०० किंवा १८०० मिमी व्यासाचे १५ पाइप बसवण्यात आले.
५) पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी ११ ठिकाणी नाले बांधले जात आहेत.