Join us

मिलन सब-वेजवळ उपसा पंप कधी लावणार? नागरिकांचा सवाल; पाणी साचलेच नाही, मनपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:08 AM

दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी येथील मिलन सब-वे आणि हिंदमाता येथे पाणी साचत होते.

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी येथील मिलन सब-वे आणि हिंदमाता येथे पाणी साचत होते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सांताक्रूझ आणि हिंदमाता येथील मिलन भुयारी मार्ग (सब-वे) येथे पाण्याचा निचरा करण्यासाठी साठवण टाक्या बांधण्यात आल्या. मात्र पालिका पालिका उपसा पंप कधी लावणार, असा सवाल नागरिक करत आहेत. 

पर्जन्य जलवहिनी विभागाने येथे पाण्याचा उपसा करणारे पंप न लावल्याने यंदा मिलन सब-वे, गांधी मार्केट आणि हिंदमाता येथे पाणी साचले, अशी माहिती नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. महापालिकेने मात्र या भागात तासाभरात पाण्याचा निचरा झाल्याचा दावा केला आहे.

गेल्यावर्षी हिंदमाता, गांधी मार्केट आणि मिलन सब-वे या परिसराला साचणाऱ्या पाण्यापासून दिलासा मिळाला होता. मिलन सब-वे येथे पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या खात्यामार्फत तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या काळात लायन्स क्लब मैदानात साठवण टाकी बांधली होती. 

गेले काही दिवस खूप पाऊस पडत आहे. पालिकेने पाणी उपसा करणारे पंपही बसवले आहेत. पूर्वी हिंदमाता आणि मिलन सब वेमध्ये १२ तास पाणी साचून राहत होते. मात्र यंदा तासाभरातच येथील पाण्याचा निचरा झाला. मिलन सब वे, हिंदमाता येथील साठवण टाक्या कार्यान्वित आहेत. - श्रीधर चौधरी, मुख्य अभियंता, पर्जन्य जलवाहिनी

साचलेले पाणी साठवण टाक्यांमध्ये-

१)  मिलन सब-वे परिसरात पावसाचे पाणी साचल्यास त्याचा उपसा करून ते साठवण टाकीत टाकले जाते. या परिसरातील टाकी सुमारे २ कोटी लिटर क्षमतेची आहे. त्यासाठी ३ हजार घनमीटर प्रतितास क्षमते दोन पंप आहेत. 

२)  हिंदमाता येथे सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद महाजन उद्यान येथे साठवण टाक्या बांधल्या आहेत. गांधी मार्केट येथेही अशीच उपाययोजना केली होती.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअंधेरीपाऊस