Join us  

मिठी नदी भोवतीचा अतिक्रमणांचा फास सुटणार कधी? गेल्या आठवड्यात अतिवृष्टी वेळी नागरिक स्थलांतरित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 9:24 AM

मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीचा तीन टप्प्यांत विकास केला जाणार असला तरी, आतापर्यंत फक्त पहिलाच टप्पा पूर्ण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीचा तीन टप्प्यांत विकास केला जाणार असला तरी, आतापर्यंत फक्त पहिलाच टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात मुंबईत  झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी नदीकाठच्या रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरित व्हावे लागले होते. नदीलगतची अतिक्रमणे हटविण्यात अजूनही पालिकेला यश आलेले नाही. परिणामी अतिक्रमणांचा अडथळा दूर होत नसल्याने कंत्राटदारही काम करण्यास फार स्वारस्य दाखवत नाहीत.

मिठी नदीच्या विकासकामाच्या पहिल्या टप्प्यात पवई फिल्टरपाडा ते डब्ल्यू. एस. पी. कंपाउंड येथील १३३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील डब्ल्यू. एस. पी. कंपाउंड ते कुर्ला सीएसएमटी रस्ता येथील ५७० कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. मात्र, ही कामे ५० टक्केच पूर्ण झाली आहेत, तर चौथ्या टप्प्यातील ४५५ कोटींची कामे करण्यात आली असून, हा टप्पा ६० टक्के पूर्ण झाला आहे.

तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी २०२२ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने २०२३ मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली. त्यावेळीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली; परंतु याही वेळेस प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर अद्याप नवी निविदा काढण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला नाही. 

दरम्यान, मिठी नदीलगत दोन हजार अतिक्रमणे आहेत. दुसऱ्या टप्प्यात काही अतिक्रमणे काढण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील अतिक्रमणे कायम असून, ती काढण्यात पालिकेला यश आले नाही.

या कामांचा समावेश-

१)  मिठी नदी विकासाअंतर्गत संरक्षक भिंत बांधणे, सर्व्हिस रोडचे बांधकाम, २५ फ्लड गेट उभारणे, सुशोभीकरण, भरती आणि ओहोटीच्या वेळीच्या उपाययोजना आदी कामे केली जाणार आहेत. 

२) २६ जुलैच्या जलप्रलयानंतर मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याची शिफारस करण्यात आली होती, तेेव्हापासून मिठी नदीचे कवित्व अजून संपलेले नाही.

टॅग्स :मुंबईनगर पालिकानदी