'ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा विकास करताना पावित्र्य जपणार'; आयुक्तांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:32 AM2024-06-28T09:32:51+5:302024-06-28T09:34:14+5:30

परिसरातील कामे पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार.  

in mumbai while developing the historical banganga lake sanctity will be maintained says bmc commissioner bhushan gagrani | 'ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा विकास करताना पावित्र्य जपणार'; आयुक्तांची ग्वाही

'ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा विकास करताना पावित्र्य जपणार'; आयुक्तांची ग्वाही

मुंबई : ऐतिहासिक बाणगंगा परिसरातील पायऱ्यांची नासधूस झाल्याप्रकरणी विविध समाजमाध्यमांतून मुंबई पालिका प्रशासनावर टीका झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी तेथील कामांची पाहणी केली. बाणगंगा परिसरातील उर्वरित कामे पुरातत्त्व विभागाशी समन्वय ठेवून नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

त्याचबरोबर वारसास्थळ परिसरात कामे करताना त्याचे पावित्र्य जपण्यात येईल, अशी ग्वाहीही आयुक्तांनी दिली. बाणगंगा तलाव परिसर आणि तेथील मंदिरांशी संबंधित कामे करताना त्याचे पावित्र्य राखले जाणे अपेक्षित असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले. शिवाय, बाणगंगा तलावातील गाळ काढण्याची उर्वरित कामे यांत्रिक पद्धतीने न करता पारंपरिक पद्धतीने करण्याचे निर्देश गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले.पाहणी करताना आयुक्तांसोबत पालिकेच्या ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. 

ऐतिहासिक बाणगंगा तलाव आणि परिसर पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत विविध कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आत एक्सकॅव्हेटर संयंत्र उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास महापालिकेने यापूर्वीच कारणे 
दाखवा नोटीस बजावली. शिवाय, त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

कंत्राटदारावर कठोर कारवाई -

पालिकेच्या ‘डी’ विभागाने बाणगंगा परिसरात पर्यटनस्थळ विकासासाठी अनेक कामे हाती घेतली आहेत. तेथील बांधकामेही निष्कासित करण्यात आली आहेत. 

दीपस्तंभ आणि पुरातन वारसा जतन (हेरिटेज)ची  कामे पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शशी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.
तलावाच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार मे. सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी केली. यावेळी सहायक आयुक्त शरद उघडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

तीन टप्प्यांत कामे -

टप्पा १ : पहिल्या टप्प्यात तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा, तलाव परिसरातील दीपस्तंभांची पुनर्उभारणी, तलावाच्या सभोवतीचा वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती मार्ग’ म्हणून विकसित करणे.  

टप्पा २ : बाणगंगा तलावातून दिसणाऱ्या इमारतींच्या दर्शनी भागाची एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, तलावास लागून असलेल्या इमारतीच्या भिंतीवर भित्तिचित्रे चितारणे आणि शिल्पे घडविणे, रामकुंड या ऐतिहासिक व पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन करणे. 

टप्पा ३ : या टप्प्यात बाणगंगा तलाव ते अरबी समुद्र या दरम्यान विस्तृत मार्गिका बनविणे. तेथील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी वाराणसीच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, सार्वजनिक जागा निर्माण करणे आदी कामे केली जाणार आहेत.

Web Title: in mumbai while developing the historical banganga lake sanctity will be maintained says bmc commissioner bhushan gagrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.