Join us  

मुंबईमध्ये यंदा पाणीकपात टळणार? जलाशयांत ९९.१८ टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 9:48 AM

सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असून, या तलावांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांत गुरुवारी सकाळी ९९.१८ टक्के इतका पाणीसाठा असल्याचे स्पष्ट झाल्याने बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे हे जलाशय १०० टक्क्यांवर जाण्याची अपेक्षा अपूर्ण राहिली आहे. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सदर बाब ही समाधानकारक मानण्यात येते. त्यामुळे पावसामुळे पुढील पाच दिवसांत सातही जलाशय १००चा आकडा गाठणार का, याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असून, या तलावांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पालिकेच्या माहितीनुसार, यामध्ये १४ लाख ३५ हजार ५२४ दशलक्ष लिटर म्हणजेच ९९.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ९९.२७ टक्के इतका नोंदवण्यात आला होता. मंगळवारपासून सुरू झालेल्या या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात खालावलेली जलाशयांची पातळी भरून निघाली आहे. त्यामुळे मुंबईला पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

तलावांतील पाणीसाठा (टक्क्यांत)-

१) तुळशी तलाव- १०० %

२) विहार तलाव- १०० %

३) तानसा तलाव- ९८.८५ %

४) मोडक सागर- ९५.३५%

५) अप्पर वैतरणा- ९९.९८ %

६) मध्य वैतरणा- ९८.९३ %

७) भातसा- १०० %

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाऊस