अंधेरीतील गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे काम फत्ते; रेल्वेच्या 'ब्लॉक' नंतर पुढील कामे होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:32 AM2024-09-11T10:32:45+5:302024-09-11T10:36:06+5:30
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागात ९० मीटरपर्यंत सरकविण्याचे काम रविवारी रात्री यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागात ९० मीटरपर्यंत सरकविण्याचे काम रविवारी रात्री यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. येत्या काही दिवसांत हा गर्डर टप्प्याटप्प्याने आठ मीटरपर्यंत खाली आणण्याचे अतिशय आव्हानात्मक काम केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
गर्डर नियोजित उंचीपर्यंत खाली आणल्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण केली जातील. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील रेल्वे ब्लॉक उपलब्ध झाल्यानंतर ही कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्यादृष्टीने पालिका प्रशासनाकडून पश्चिम रेल्वे सोबत समन्वय साधण्यात येत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. गोखले पुलाच्या कामातील पहिला टप्प्या २६ फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. याचाच पुढील टप्पा म्हणून रविवारी रात्री १० वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत हा गर्डर रेल्वे भागावर उर्वरित ६५ मीटरपर्यंत म्हणजेच एकूण ९० मीटरपर्यंत सरकविण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
सुरक्षेला प्राधान्य एखाद्या पुलाच्या कामात १४ ते १५ मीटर उंचीवरून गर्डर विशिष्ट उंचीपर्यंत खाली आणणे, असे हे भारतातील पहिलेच काम ठरणार आहे. रेल्वे परिसरातील भागात हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. गोखले पुलाच्या गर्डरच्या कामानंतर या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
समन्वय साधला...
१) पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पूल विभागाने पश्चिम रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून ही पूर्ण केली.
२) प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी कामाचे योग्य नियोजन केले.
३) पश्चिम रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणांतर्गत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.