पाऊस लांबल्याने पिकनिकला लागला ब्रेक, तरुणाईचे नियोजन झाले; पावसाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:18 AM2024-06-27T11:18:05+5:302024-06-27T11:20:12+5:30
जून महिना संपत आला तरी समाधानकारक पावसाचे आगमन झाले नसल्याने पावसाळी पिकनिकला जाणाऱ्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
मुंबई : जून महिना संपत आला तरी समाधानकारक पावसाचे आगमन झाले नसल्याने पावसाळी पिकनिकला जाणाऱ्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पाऊस लांबल्याने मुंबईतील पर्यटकांच्या पिकनिकला ब्रेक लागला आहे.
सध्या पिकनिक होत असल्या तरी त्या रिसॉर्टपुरत्याच होत आहेत. रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल किंवा रेन डान्समध्ये भिजण्याचा आनंद घेतला जात आहे. मात्र धबधब्यावर जाण्याची इच्छा सध्या तरी अपूर्णच राहिली आहे. जून महिना संपत आला, तरी पावसाने ठाणे, मुंबई परिसरात दडी मारल्याने तरुणाईच्या पावसाळी पिकनिकला ब्रेक लागला आहे. पिकनिकचे सर्व प्लानिंग झाले असले, तरी पावसाचा पत्ताच नसल्याने तरुणाईमध्ये नाराजीचा सूर आहे. आज, उद्या धो धो पाऊस पडेल, अशा विचारात असणारी तरुणाई पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी पिकनिक लांबणीवर पडल्या आहेत. जूनचा तिसरा आठवडा उलटला तरी अद्याप पावसाने कृपादृष्टी न केल्याने सहलप्रेमींचे वीकेण्ड् कोरडे जात आहेत.
वरूणराजा का रुसला?
या आठवड्यात लाँग वीकेण्ड असल्याने लवकरच पाऊस यावा, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. या सर्वच ठिकाणी जाण्यासाठी सहलप्रेमी उत्सुक आहेत. परंतु, वरुणराजा काही बरसत नसल्यामुळे त्यांच्या प्लान्सला कात्री लागली आहे. जुलै महिन्यात तरी समाधानकारक पाऊस पडेल आणि पिकनिकचे प्लॅन्स रंगतील अशा आशेवर तरुणाई आहे.
धबधबे, गडकिल्ल्यांवर भटकंती-
१) मित्र-मैत्रिणींमध्ये पिकनिकच्या चर्चा रंगत असल्या, तरी पाऊस आल्यावर पिकनिकच्या तारखा ठरवू, असा सूर तरुणांच्या गटांत आहे.जून महिना सुरू झाला की, पिकनिकच्या नियोजनाला उधाण येते.
२) या दिवसांत सहलप्रेमींना खुणावतात ते धबधबे, ट्रेकिंग पॉइंट, रिसॉर्ट. कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते.
३) भंडारदरा, कोंडेश्वर, वदप, भुशी डॅम, भिवपुरी, पळसदरी, माथेरान, तुंगारेश्वर, राधा फॉल, पांडवकडा, झेनीथ, गाढेश्वर, फणसाड, आषाणे, थिदबीचा धबधबा, तर ट्रेकिंगसाठी गडकिल्ले अशा अनेक ठिकाणांची निवड सुरू होते.