ऑक्टोबर तुम्हाला भाजून काढणार; राज्यभर जाणवणार उन्हाचे चटके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:55 AM2022-10-03T05:55:06+5:302022-10-03T05:55:43+5:30
येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यभरातून पाऊस काढता पाय घेणार असून त्यानंतर मात्र नागरिकांना उन्हाचे चटके बसणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यभरातून पाऊस काढता पाय घेणार असून त्यानंतर मात्र नागरिकांना उन्हाचे चटके बसणार आहेत. हिट जाणवणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता ५० टक्के आहे. म्हणजे दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता, यामुळे दिवसाचे वातावरण जाचक ठरेल.
संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात पहाटे पाच वाजताचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता ५५ टक्के आहे. यामुळे रात्री थंडी जाणवेल. पहाटेपासून दव पडण्याची शक्यता आहे. कोकणात सरासरीइतके तर खान्देशात सरासरीपेक्षा अधिक किमान तापमान जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यातील सुख अनुभवल्यानंतर आता नागरिकंना ऑक्टोबर हीटसाठी सज्ज राहावे लागणार आहे. संपूर्ण देशामध्ये लेह लडाख व पूर्व तमिळनाडू वगळता ऑक्टोबर महिन्यात जेवढा पाऊस पडतो म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सरासरी पावसाच्या ११५ टक्केपेक्षा अधिक पाऊस देशात अपेक्षित आहे.
परतीच्या पावसाने आगेकूच केली आहे. राजस्थानबरोबरच जम्मू, हरयाणा, पंजाबच्या काही भागातून म्हणजे जम्मू, दिल्ली, चंदीगड, जोधपूर, नालिया येथून मान्सून माघारी फिरला आहे. तर महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाचा जोर पूर्णपणे नाही; पण, काहीसा कमी होईल. - माणिकराव खुळे, माजी हवामान अधिकारी, भारतीय हवामानशास्त्र विभाग
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"