मुंबई-
काही गोष्टी सहन करण्याची मर्यादा असते पण पाणी डोक्यावरुन जातं तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. आम्ही जे केलं त्यामुळे आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असं नाहीय नाना, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लोकमत' आयोजित 'महाराष्ट्राची महामुलाखत'मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यासमोर आपलं मन मोकळं केलं. शिवसेनेतून बंड करण्याची वेळ का आली यामागची भावनिक आणि राजकीय कारणं शिंदे यांनी यावेळी सविस्तर सांगितली. नाना पाटेकर यांनी आज लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, CM शिंदेंनी थेट कायद्यावर बोट ठेवलं आणि गणित समजावलं...
"ज्या पक्षामध्ये आम्ही इतके वर्ष काम केलं. रक्त आटवलं, घाम गाळला आणि आयुष्यभर फक्त पक्ष एके पक्ष केलं. कधीही कुठंही घरादाराचा विचार केला नाही. घरातून निघालं की परत येऊ की नाही याची शाश्वती नसायची. इतकं सगळं करुनही जेव्हा कुठं चुकीचं घडू लागलं. पक्षाच्या प्रमुखांना निर्णय घेण्याचे अधिकार असतात. पण पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन ते घ्यायचे असतात. पक्षाचं नुकसान होतंय आणि ते वाचवण्यासाठी जर आम्ही हा निर्णय घेतला असेल तर त्याच चुकीचं काहीच नाही. कारण आम्ही पाचवेळा विनंती केली होती. संधी आली होती पण दुर्दैवानं तसं केलं गेलं नाही. मी बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे हे मोठं पाऊल उचललं", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मतदार म्हणून आम्हाला किंमत नाही का?, नानांनी पहिल्याच प्रश्नात बॉम्ब टाकला; CM शिंदे म्हणाले...
धनुष्यबाण आम्हालाच मिळणार शिंदे यांनी धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मिळण्यामागचं गणित समजावून सांगितलं. "आम्हाला निवडणूक चिन्हाबाबत कुणाला काहीच सांगण्याची गरज नाही. मेरिटच्या जोरावर ते आम्हालाच मिळेल. अंधेरीची पोटनिवडणूक लागली म्हणून निवडणूक आयोगाला निर्णय घेता आला नाही. पण आगामी काळात धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. याचं कारण म्हणजे ५५ पैकी ४० आमदार आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मतांची आकडेवारी ३९ लाख इतकी आहे. तसंच १८ पैकी १२ खासदार आमच्यासोबत आहेत आणि त्यांची मतांची आकडेवारी ६९ लाख इतकी आहे. म्हणजेच पक्षाला पडलेल्या एकूण मतांपैकी ७० टक्क्यांहून अधिक मतं आमच्याबाजूनं आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकशाहीत बहुमताला मान असतो. धनुष्यबाण चिन्ह यानुसार आम्हालाच दिलं जाईल आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सन्मान होईल", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.