मुंबई : मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील प्रतीक्षानगर येथील कर्मवीर भाऊराव पाटील शाळेमध्ये मतदारांना मतदानासाठी तब्बल चार तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. या मतदान केंद्रात बूथ क्रमांक १७ ते २३ अशा बूथनिहाय मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, केवळ १८ क्रमांकाच्या बूथवर येणाऱ्या मतदारांनाच किमान दोन तास ते कमाल चार तास रांगेत उभे राहावे लागले. प्रचंड ऊन, पंख्याची व्यवस्था नाही अशा परिस्थितीतही अनेक मतदारांनी चिवटपणे मतदान केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मुळात आजवर या परिसरातील लोकांचे मतदान हे प्रतीक्षानगरातील प्रशस्त अशा मुंबई पब्लिक स्कूलमध्ये होत होते. त्यामध्ये यंदा बदल करत ती व्यवस्था कर्मवीर भाऊराव पाटील या छोटेखानी शाळेत करण्यात आली. मतदान केंद्र का बदलण्यात आले, असा सवाल अनेक मतदार विचारत होते. तसेच, आजवर महिला व पुरुष यांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात येत होत्या. यंदा मात्र दोघांचीही रांग एकच होती.
दीडपर्यंत रांगेतच थांबावे लागले...
१) सकाळी लवकर गर्दी नसते या विचारांनी अनेक जण या केंद्रावर गेले. मात्र, जे सकाळी साडेसात वाजता पोहोचले त्यांनाही दोन तास रांगेत उभे राहावे लागले.
२) दुपारनंतर गर्दी कमी होईल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, दुपारी एक वाजता मतदानासाठी पोहोचलेल्या मतदारांनादेखील चार वाजेपर्यंत रांगेत उभे राहावे लागले. या मतदान केंद्रातील १८ क्रमांकाचा बूथ वगळता उर्वरित सर्व बूथवर एकावेळी दहा मतदारांना मतदानासाठी सोडण्यात येत होते.
३) १८ क्रमांकाच्या बूथवर ज्यामध्ये १,३९२ मतदारांचे मतदान होते त्या रांगेतून मात्र एकावेळी केवळ पाचच लोकांना आत सोडण्यात येत होते. पाच मतदार आत गेल्यानंतर पुढच्या पाच मतदारांना सोडण्यासाठी किमान दहा मिनिटे लागत होते.
४) मतदारांनी मतदान केंद्राचे अधिकारी, उपस्थित पोलिस यांना विचारणा केली असता त्यांनीदेखील फारसे समाधानकारक उत्तर दिले नाही. अनेक जण अर्धा-पाऊण तास रांगेत उभे राहून मतदान न करताच घरी परतल्याचेही चित्र होते.