१६ वर्षीय कृशाचे ११० दिवसांचे उपवास, असामान्य तपश्चर्येनंतर शाह कुटुंबीयांकडून भव्य उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 01:21 PM2023-10-30T13:21:38+5:302023-10-30T13:22:00+5:30
शनिवारी ११० दिवसांचा कठीण अन्नाशिवाय उपवास केला पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदाबाद / मुंबई: कांदिवली (पश्चिम) येथील १६ वर्षीय कृशा शाह हिने सलग तीन महिने आणि २० दिवस अन्नाशिवाय शनिवारी ११० दिवसांचा कठीण उपवास पूर्ण केला. त्याबद्दल शाह कुटुंबीयांनी भव्य उत्सवाचे आयोजन केले होते. साधू आणि साध्वींनी यापूर्वी अशी तपश्चर्या केली असली, तरी दीर्घकाळ उपवासाचा अनुभव नसलेल्या तरुण मुलीसाठी हे असामान्य आहे, असे जैन धर्मातील तज्ज्ञांनी सांगितले.
गुरूंचा होता विश्वास ...
७१ दिवसांनंतर गुरूंना विश्वास होता की, ती १०८ दिवसांचे कठीण लक्ष्य साध्य करू शकते; परंतु कुटुंबीयांना शंका वाटत होती. ८०व्या दिवशी कृशा गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली, तेव्हा तिला आठ दिवसांच्या उपवासासाठी तेथे आलेल्या साधूंकडून प्रेरणा मिळाली.
आत्मनियंत्रणामुळे शक्य
कृशाचे आध्यात्मिक गुरू मुनी पद्मकलश महाराज म्हणाले की, पहिल्याच प्रयत्नात आणि दीर्घकालीन उपवासाचा पूर्वानुभव नसताना हा उपवास करणे, हे आत्मनियंत्रण, शिस्तीमुळेच शक्य होते.
ती केवळ उकळलेले पाणी पित असे
- कृशाची आई रूपा शाह म्हणाल्या की, कृशाने गुरू मुनी पद्मकलश महाराज यांच्याकडे उपवास करण्याची परवानगी मागितली आणि ११ जुलैपासून उपवास सुरू केला. ती फक्त सकाळी ९ ते संध्याकाळी ६:३० या वेळेतच उकळलेले पाणी पित असे.
- तिला कोणतीही आरोग्य समस्या उद्भवत नसल्यामुळे तिने १६ दिवसांचा उपवास १० दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला. २६ दिवसांनंतर तिने ३१ दिवसांचे लक्ष्य ठेवले. लवकरच हे लक्ष्य ५१ दिवसांवर केले. टप्प्याटप्प्याने तिने उपवासाचा कालावधी वाढवत नेण्याचा प्रयत्न केला.
- तिने पवित्र पर्युषण महिन्यात आपले व्रत समाप्त करण्यासाठी पुन्हा २० दिवसांच्या उपवासाचे व्रत घेतले. उपवासाच्या ४०व्या दिवसांपर्यंत ती महाविद्यालयाला जात होती. ती कांदिवलीच्या केईएस महाविद्यालयात अकरावीत शिकते.