Join us

व्हिडीओ कॉल करत बॉम्बस्फोटाची धमकी; मद्यपिला गुन्हे शाखेकडून अटक 

By गौरी टेंबकर | Published: September 24, 2022 9:29 PM

उपनगरातील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला व्हिडियो कॉल करत देशात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.

गौरी टेंबकर - कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: उपनगरातील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला व्हिडियो कॉल करत देशात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्याला गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. तो कॉल दारूच्या नशेत करण्यात आल्याचे उघड झाले असून त्याला सांताक्रुझ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव रामकुमार सोहनी (२५) असे आहे. त्याला मरीन लाइन्स परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने नशेत हा प्रकार केल्याचे उघड झाले असुन त्याने खोडसाळपणाने हा प्रकार केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रफत हुसैन (५५) असे तक्रारदाराचे नाव आहे. जे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी सांताक्रुझ पोलिसाना दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींकडून त्यांना कथितरित्या व्हिडिओ कॉल केला. कॉलर ने दावा केला की ते देशात  बॉम्बस्फोट घडवून आणणार आहेत.  त्यानंतर हुसैन यांनी सांताक्रूझ पोलिस ठाणे गाठले आणि अधिकार्‍यांना धमकीच्या कॉलबद्दल माहिती दिली. 

त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सदर अनोळखी व्यक्ती विरोधात कलम ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याचा शोध सुरू आहे असे त्यांनी सांगितले. तांत्रिक तपास करत आरोपीची ओळख पटविण्यात आली असुन त्याच्या मागावर राहत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांनी ही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यापूर्वी १९ सप्टेंबर रोजी देखील मुंबई पोलिसां च्या नियंत्रण कक्षावर झवेरी बाजार परिसरात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. मात्र पोलिसांनी लगेचच तपास करत दिनेश सुतार नावाच्या व्यक्तीला अटक करत तो फेक कॉल असल्याचे उघड केले होते. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई