शिवडी मतदारसंघात ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती; १० विधानसभांपैंकी मुंबादेवीमध्ये कमी वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 11:36 AM2024-04-09T11:36:55+5:302024-04-09T11:39:58+5:30
गेल्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई शहरात एकूण २४,५३० नागरिकांनी ‘नोटा’चा वापर केला.
संतोष आंधळे, मुंबई : गेल्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई शहरात एकूण २४,५३० नागरिकांनी ‘नोटा’चा वापर केला. शहरातील १० विधानसभापैंकी सर्वांत जास्त ‘नोटा’ पर्यायाचा वापर शिवडी मतदारसंघात झाल्याचे चित्र दिसून आले आहे. त्या ठिकाणी ३,८५५ नागरिकांनी ‘नोटा’ला मतदान केले होते.
निवडणूक आयोगाने निवडणुकीत कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर त्याबद्दल नापसंती व्यक्त करण्याचा अधिकार ‘नोटा’च्या निमित्ताने मतदारांना दिला आहे. नोटा म्हणजे वरीलपैकी कोणताही नाही. उमेदवाराची जी यादी असते त्यापैकी सर्वांत नोटा हा शेवटचा पर्याय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी दिला आहे. त्यामुळे मतदान यंत्रावरील उमेदवार यादीतील कोणताही उमेदवार योग्य न वाटल्यास मतदार या पर्यायाचा वापर करत असतो. मुंबई शहर जिल्ह्यात दोन लोकसभा येतात.
मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघ त्यातील दोन मतदारसंघ हे उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे येतात. दोन लोकसभांतील १० विधानसभा मतदारसंघ मुंबई जिल्ह्यात येतात. या शहरात एकूण २४,९०,७२८ नोंदणीकृत मतदार आहे. त्यामध्ये १२,८८,५५४ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी २४,५३० मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांबाबत नापसंती व्यक्त केली. त्यांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. याचा सर्वच राजकीय पक्षांनी विचार करण्याची गरज आहे.