मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव म्हणत लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार, २० मार्च ते ४ जून या कालावधीत निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला असून यंदाही ७ टप्प्यात निवडणुका होत आहेत. देशातील सर्वाधिक लोकसभा सीट असलेल्या उत्तर प्रदेशातही ७ टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल ते २० मे पर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मतदान होणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान ठेवल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. तसेच, महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका कशासाठी?, असा सवालही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विधानभवनात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी नाना पटोलेंसह बडे काँग्रेस नेते विधानभवन येथे आले होते. त्यावेळी, नाना पटोलेंना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तरे दिली. तसेच, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही नानांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होत असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभा निवडणुका कशासाठी?, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. जर निवडणूक आयोगच एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वागू लागला, तर ही धोक्याची घंटा आहे, असेही पटोले यांनी म्हटले. दरम्यान, महाराष्ट्रात १९ एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होत असून २० मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाणे, व कोकणातील काही जिल्ह्यात मतदान होणार आहे. दरम्यान, गत २०१९ मध्ये महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या.
निवडणूक आयोगाने ७ टप्प्यात निवडणुकांची घोषणा केली असून उत्तर प्रदेशातही ७ टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होम स्टेट असलेल्या गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. गुजरातमध्ये, ७ मे रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये २६ जागांसाठी एकाच टप्प्यात ही निवडणूक होत आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे होम स्टेट आहे. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपाने गुजरातमध्ये सर्वच २६ जागांवर निवडणूक जिंकली होती. काँग्रेसला येथे एकही जागा जिंकता आली नाही.