सुजात आंबेडकर यांची उमेदवारी गुलदस्त्यात; ‘वंचित’च्या उमेदवारी बदलाची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 11:07 AM2024-04-13T11:07:32+5:302024-04-13T11:14:32+5:30
दक्षिण मध्य मुंबईत चर्चेत असलेले सुजात आंबेडकर यांची उमेदवारी गुलदस्त्यात आहे.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने उत्तर मध्य मुंबईसाठी घोषित केलेले अबुल हसन खान यांची उमेदवारीत गुरुवारी उशिरा बदल करून त्यांना ‘मुंबई दक्षिण मध्य’चे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिण मध्य मुंबईत चर्चेत असलेले सुजात आंबेडकर यांची उमेदवारी गुलदस्त्यात आहे. ‘वंचित’च्या या उमेदवारी बदलाची जोरदार चर्चा आहे.
उत्तर मध्य मुंबईतील निर्णायक मुस्लिम मतांचे गणित आखून वंचितने मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान यांना भाजपची हॅट्ट्रिक मोडण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र, त्याची घोषणा होऊन चौदा दिवसांत उमेदवारीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांकडून ‘वंचित’च्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सुजात आंबेडकर यांच्या नावासाठी कार्यकर्त्यांकडून आग्रह होता. त्यासाठी वर्षभर वंचितकडून बांधणी सुरू होती.
कोणाला फायदा?
सुजात आंबेडकर यांना उमेदवारी मिळेल म्हणून कार्यकर्ते आनंदात होते. मात्र, अचानक उमेदवार बदल करून अबुल खान यांना दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार म्हणून घोषित केले. सुजात आंबेडकरांसाठी सुरक्षित मतदार संघ उरलेला नाही. त्यांची उमेदवारी पुन्हा गुलदस्त्यात आहे. दक्षिण मध्य मुंबईत वंचित नेमकी कोणाची मते खाणार? कोणाला पाडण्यासाठी मदत करणार? याची जोरदार चर्चा धारावीत रंगली आहे.